वेगातील टेम्पोची ऑटोला धडक, सहा जखमी
हिमायतनगर : शहरानजीकच्या दारुलउलुम शाळेजवळ वेगातील टेम्पोने ऑटोला धडक दिल्याने सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी घडली. एम.एच.२०-ई.जी. ६००५ असा टेम्पोचा तर एम.एच.२६-ए.ओ.३१०४ असा ऑटोचा क्रमांक आहे. धडक दिल्यानंतर ऑटो उलटला झाला. यात ऑटोमधील श्यामकाबाई चव्हाण, रामराव बोकारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शांताबाई हणमंते, बालाजी चव्हाण, संगीता सूर्यवंशी, महानंदा सूर्यवंशी आदी जखमी झाले. जखमी सर्व जण खडकी येथील रहिवासी आहेत. हदगावच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. भुरके यांनी तपास करून सर्वांना नांदेडला पाठविले. पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेतील दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावली आहेत.
यशवंतराव चव्हाण जयंती
धर्माबाद : तालुक्यातील पाटोदा बु. येथील के.एम. पाटील माध्यमिक विद्यालयात १२ मार्च रोजी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डी.वाय. शिंदे यांनी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाला सहशिक्षक बी.यू. नरवाडे, टी.आर. भारसावडे, डी.आर. गबाळे, एस.डी. नरवाडे, आर.एन. हंबर्डे, उदय पाटील, कुणाल पवारे, व्ही.जी. पपुलवाड, व्ही.व्ही. गट्टुवार, के.आर. वाघमारे, जी.एम. जालनेकर, एम.बी. शेख आदी उपस्थित होते.
विभागीय समितीत निवड
किनवट : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी विभागीय समितीत किनवट तालुक्यातील नीळकंठ कातले, जनाबाई डुडुळे, ज्ञानेश्वर जेवलेवाड यांचा समावेश करण्यात आला. जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वनहक्क दाव्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली.
परीक्षा निर्धारित कालावधीत घ्या
किनवट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा निर्धारित कालावधीत घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी किनवट शाखेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. निवेदनावर किशनराव राठोड, आजीमखान पठाण, विकास गोणारकर, आदित्य भवरे यांची नावे आहेत.
सर्वांनी लस घ्यावी
बामणीफाटा : सध्या ६० वयावरील पुरुष व स्त्री तसेच ४५ वयोगटावरील व्याधीग्रस्त व्यक्तींना कोविड लस देण्यात येत आहे. बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात संदीपराव काळबांडे, डॉ. मानसपुरे, डॉ. शीतल नरतेवाड यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी ज्ञानेश्वर मस्के, अरविंद तामसेकर, आनंदराव मस्के, साहेबराव दहीभाते आदी उपस्थित होते.
शुक्रवारचा आठवडी बाजार बंद
मुक्रमाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्रमाबाद येथे दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार पोलिसांकडून रद्द करण्यात आला. त्यामुळे भाजीपाला बाजार भरला नाही. मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना पोलीस व ग्रामपंचायतकडून सूचना देण्यात आली. तथापि, बरेच नागरिक विनामास्क फिरताना आढळून आले.
नियम पाहून दर्शन
बामणीफाटा : महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी कोरोनाचे नियम पाळण्यात आले. परिसरातील अडीच लिंगेश्वर देवस्थान, शिवदरा, नंदी महाराज कवाना, महादेव मंदिर करमोडी, बस्वलिंग महादेव मठ आणि वानवाडी नगरमधील महादेव मंदिर परिसरात भाविक होते. यानिमित्ताने पारायण, भजन, कीर्तन, अभिषेक आदी कार्यक्रम झाले. समाज बांधवांच्या वतीने शाबुदाना खिचडी, केळी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला.
३८ महिलांना शिलाई मशीन
भोकर : येथील वल्ड व्हीजनच्या वतीने तालुक्यातील ३८ महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने शुक्रवारी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पं.स. सभापती नीता रावलोड, प्रकल्प अधिकारी श्याम बाबू उपस्थित होते. शिलाई मशीन व्यवसायात मिळालेल्या मिळकतीतून बचत करावी व पाल्याचे शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन यावेळी वर्ल्ड व्हीजनच्या वतीने करण्यात आले.