मौजे बलूर येथे घरफोडीची घटना
देगलूर तालुक्यातील मौजे बलूर येथे चोरट्याने घर फोडून ऐवज लंपास केला. ही घटना २८ मार्च राेजी घडली. प्रमोद माधवराव बिरादार यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी ३२ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने आणि रोख चार हजार रुपये असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चालकाच्या घरातून दागिने लांबविले
शहातील बसंतानगर येथे चोरट्याने एका चालकाचे घर फोडून २३ हजार रुपयांचे दागिने लांबविले. ही घटना २८ मार्च रोजी घडली. गंगाधर परमेश्वर अनमुलवार यांच्या घरात प्रवेश करून कपाटाचे लॉक चोरट्याने तोडले होते. त्यानंतर २३ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आखाड्यावरून शेळी, बकरे चोरीला
लोहा तालुक्यातील मौजे आडगाव येथे आखाड्यावर बांधलेली शेळी आणि तीन बकरे चोरीला गेले आहेत. ही घटना २७ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हदगांव, सोनखेडात अवैध दारू पकडली
सध्या लॉकडाऊन असून मद्य विक्रीला बंदी आहे. त्याचा फायदा घेऊन अनेकजण अवैधपणे मद्य विक्री करीत आहेत. पोलिसांनी हदगांव आणि सोनखेड येथे दारू पकडली. मौजे हस्तरा येथून २१ हजार ८१२ रुपयांची दारु पकडण्यात आली. तर सोनखेड येथे एका हॉटेलसमोरून तीन हजार रुपयांची देशी दारू जप्त केली. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.