लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वजिराबाद भागातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळणार आहे़ त्यासाठी पाचशे एलपीएच क्षमतेचे सयंत्र या ठिकाणी बसविण्यात आले आहे़ तर डॉक्टर व इतर कर्मचा-यांना पाण्यासाठी एटीएम कार्ड देण्यात आले आहे़शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण येतात़ त्यांच्यासाठी या ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णालयाबाहेर असलेल्या हॉटेलवरुन रुग्णांच्या नातेवाईकांना विकत पाणी आणावे लागते़ ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना दररोज पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडणारे नसते़ त्यामुळे गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात आले आहे़ या जलशुद्धीकरण सयंत्राद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना केवळ एक रुपयात १ लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे़ तर २ रुपयांत एक लिटर थंड पाणी मिळेल़पाण्यासाठी या ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आली आहे़ या मशीनमध्ये एक रुपयाचा क्वॉईन टाकल्यानंतर लगेच एक लिटर शुद्ध पाणी मिळेल़ तर महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचा-यांना पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे़ तर १० रुपयात थंड पाणी मिळेल़ यासाठी विद्यार्थी व कर्मचा-यांना एटीएम कार्ड देण्यात येणार आहे़ दर महिन्याला दीडशे रुपयांचे रिजार्च केल्यानंतर सदरील कार्डाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध केले जाणार आहे़ ही सेवा २४ तास सुरु राहणार आहे़सोमवारी अधिष्ठाता डॉ़ बी़ एच़ श्यामकुंवर यांच्या हस्ते संयत्रांचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी डॉ़अन्नापुरे, डॉ़संत, डॉ़ उकळकर, चंचलवार, तबलेवाले, डॉ़ अमिलकंठवार, विठ्ठल पंजोल, प्रशांत दळवी, ए़ डी़ डोणगावे, सुमंगला इंटरप्रायजेसचे चैतन्य कोंडावार यांची उपस्थिती होती़रुग्णालयात जलशुद्धीकरण सयंत्र बसविल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आता शुद्ध पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार नाहीत़
विष्णूपुरी येथे साईप्रसादने घेतला पुढाकारविष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साईप्रसादच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून कॅनद्वारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर आता साईप्रसादने या परिसरात दोन अमृतकुंड बांधले आहेत़ त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो़ अमृतकुंडाबरोबरच साईप्रसादने रुग्णालय परिसरात उद्यानही विकसित केले आहे़ त्यासाठी साईप्रसादचे दानशूर परिश्रम घेत आहेत़