केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या संपूर्ण देशभरात ॲलोपॅथी विरुध्द आयुर्वेद अशी लढाई रंगली आहे. आयुर्वेदाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना ॲलोपॅथीमधील ५८ शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारला होता.
आयुर्वेद तज्ज्ञ अनेक वर्षांपासून मॉडर्न मेडिसीनचे औषधे देण्यासह काही प्रकारच्या शस्त्रक्रियाही करत होते. त्या शस्त्रक्रिया करण्यास अन्य पॅथींच्या डॉक्टरांचा विरोध होता. मात्र, आता ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’ने (सीसीआयएम) राजपत्र प्रसिद्ध करून, आयुर्वेद तज्ज्ञांना कान, नाक, घसा, तसेच डोळ्यांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाचे आयुर्वेद तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. तर इंडियन मेडिकल असोसिएशनसह ॲलोपॅथी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी त्यास विरोध दर्शविला आहे.
केंद्र सरकारच्या अंतर्गत आयुर्वेदिक पदवी धारकाचे नियमन करणाऱ्या सीसीआयएमने ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया परवानगीसंबंधी अधिसूचना जारी केली. खरं तर शल्यक्रिया हा काही आयुर्वेदाचा नवा भाग नाही व अष्टांग आयुर्वेदामध्ये शल्य व शलाक्य हे शस्त्रक्रियेसंबंधित दोन भाग आहेत. तसेच हा काही शासनाचा नवा निर्णय नाही तर २०१६ मधील अधिसूचनेसंबंधी खुलासा आहे. ज्याप्रमाणे आजचे आधुनिक वैद्यकीय शास्त्र हे आधुनिक संशोधनाचा उपयोग घेऊनच प्रगत झालं आहे. तसेच आयुर्वेदानेही आधुनिक संशोधनाचा उपयोग घेऊन प्रगती केली तर काय बिघडले? खरं तर आयएमएने खुल्या दिलाने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे. आयुर्वेद व्यासपीठ शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करते.
- डॉ.भास्कर जन्नावार
अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ, नांदेड शाखा
(आयुर्वेद पदवीधारकांची संघटना)
वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना एखाद्या विषयात एमडी व्हावे लागते आणि त्यानंतरच त्यांना संबंधित अवयवांची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाते. मॉडर्न मेडिसीनचा स्वीकार करत असताना आयुर्वेद शिक्षण घेणाऱ्यांना शस्त्रक्रिया करण्याची मुभा देण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यास आमचा कडाडून विरोध आहे. आम्हाला दर पाच वर्षांनी आमचा परवाना नूतनीकरण करावा लागतो, त्यावेळी ५० पॉइंट असणे अनिवार्य असते. प्रॅक्टिस करताना विविध कायदे आणि नियम लक्षात घेऊन काम करावे लागते. मग, अशाप्रकारे निर्णय घेऊन एकप्रकारे वैद्यकीय शास्त्राचा हा अवमान आहे. म्हणजे, रिक्षा चालकांना विमान चालविण्यास मुभा देण्यासारखा हा प्रकार असून त्यास आमचा विरोधच आहे.
डॉ.देवेंद्र पालिवाल, अस्थिरोग तज्ज्ञ