नांदेड : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे लाखो अनुयायी आहेत़ परंतु नांदेडातील पहिले शिष्य बाबू स्वामी शेवडीकर यांनी तब्बल पाच दशके महाराजांसोबत सावलीप्रमाणे राहून त्यांची सेवा केली़ १९६९ साली ते महाराजांच्या सानिध्यात आले होते़ त्यानंतर राज्यभर त्यांनी महाराजांसोबत दौरे केले़ त्यांच्या या पाच दशकांच्या नि:स्वार्थ सेवेमुळेच महाराजांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते़
बाबू स्वामी शेवडीकर हे १९७१ मध्ये एका कापड दुकानात कामाला होते़ त्यावेळी अहमदपूरकर महाराज हे त्यांना भेटण्यासाठी एसटीने अहमदपूर येथून नांदेडला येत होते़ त्यावेळी अहमदपूर-नांदेड बसचे तिकीट दोन रुपये होते़ बसस्थानकावर स्वामी त्यांना घेण्यासाठी जात होते़ त्यानंतर कापड दुकानात महाराज येवून बसत़ त्यावेळी किर्तने फारशी होत नव्हती़ किर्तनाला शंभर ते दीडशे भक्त राहत होते़ महाराजांनी मन्मथस्वामी पदयात्रा सुरु केली़ त्यावेळी पाऊलवाट होती़ स्वामी हे सुद्धा महाराजांसोबत प्रत्येक दिंडीत सहभागी होत़ अख्खा महाराष्ट्र महाराजासोबत स्वामी यांनी बसने प्रवास केला़
१९९२ मध्ये औरंगाबाद येथे महाराजांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली़ त्यावेळी सेवेसाठी स्वामी हे सोबत होते़ स्वत: आपल्याच हाताने ते स्वयंपाक बनवत होते़ कपडेही स्वत:च धुवायचे़ सेवेकरी फक्त त्यांच्या जवळचे साहित्य ठेवायचे़ पहाटे पाच वाजेपासून त्यांचा दिनक्रम सुरु होत असे़ स्रान पुजेनंतर ते सर्व वर्तमानपत्रे चाळत होते़ काही दिवसापूर्वीच स्वामी हे नांदेडला महालक्ष्मी सणासाठी आले असताना महाराजांनी स्वामी यांना परत अहमदपूरला आवर्जून बोलावून घेतले होते़ नांदेड येथील काब्दे रुग्णालयातही बाबू स्वामी सतत महाराजांच्या सेवेत कार्यरत होते़ तब्बल पाच दशके महाराजांसोबत सावलीप्रमाणे राहिलेल्या स्वामी यांनी महाराजांच्या अखेरच्या काळातही मनोभावे त्यांची सेवा केली़
मूठभर तांदूळ अन् मूठभर मुगदाळमहाराजांचा आहार हा मर्यादीत होता़ लसन, कांदा, मिर्ची ते जेवणात घेत नसत़ त्या ऐवजी अद्रक, जिरे, मिऱ्याचे पीठ, शेंदेमीठ याद्वारे ते मुगाची दाळ, भात, दूध-भाकर असे साधे जेवण घेत होते़ पेरु, सिताफळ, पपई, अननस ही त्यांची आवडती फळे होती़ शिवलिंग शिवाचार्य महाराज सकाळी पुजेनंतर एकवेळेस पोटभरुन पाणी पिल्यानंतर ते पुन्हा सायंकाळीच पाणी पीत़ प्रवासातही ते कधीच पाणी पीत नव्हते़ अत्यंत साधा आहार ते घेत होते़ अशी माहिती बाबू स्वामी यांनी दिली़