श्यामनगरच्या स्री रुग्णालयात सध्या चार नवजात अर्भक दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भंडारा येथे घडलेल्या घटनेनंतर रुग्णालयाचे प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात पूर्वीपासूनच नवजात अर्भक तसेच मातांची योग्य काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. बाळाच्या विकासासाठी काळजी घेणे, स्वच्छता ठेवणे, स्तनपान, मातेचे दूध काढणे, कक्षात उपस्थित आरोग्य आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांना बोलावणे, कांगारू माता काळजी पद्धती, डिस्चार्ज व घरी बाळाची कशी काळजी घ्यायची याची तयारी करून घेणे, त्याचा पाठपुरावा करणे, अनुपालनाबाबत सूचना, लसीकरण आदी कामे कर्मचाऱ्यांकडून वेळेवर करून घेतली जातात. २०१८ मध्ये एसएनसीयू विभागातील नवजात बालकास नि:शुल्क अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरवणे व विभागातून सुटी झालेल्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे, या महत्त्वाकांक्षी उपक्रमात या रुग्णालयाने राज्यात चाैथा क्रमांक मिळविला आहे. असे असले तरी या रुग्णालयाची इमारत जुनी झाली असून, नवीन इमारत आवश्यक आहे. महापालिकेअंतर्गत असलेल्या इमारतीसंदर्भात अनेकदा वरिष्ठांच्या कानावर घातले असले तरी त्याबाबत अद्याप गांभीर्य बाळगण्यास कोणी तयार नाही. दरम्यान, या रुग्णालयातील उपचारपद्धती व कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या चांगल्या वर्तणुकीबद्दल रुग्णासह नातेवाइकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी आम्ही आमच्या रुग्णाला या दवाखान्यात दाखल केले. आता बाळ व आई दोघेही चांगले आहेत. बाळाला आयसीयूमध्ये ठेवले असून, रुग्णालयातील कर्मचारी त्यांची योग्य काळजी घेत आहेत. - अनिसा बेगम, खडकपुरा,नांदेड, (नातेवाईक)
आमचे बाळ आयसीयूत असून त्याची तब्येत चांगली आहे. दवाखान्यातील कर्मचारी वेळोवेळी बाळाची काळजी घेत आहेत. रात्रीच्या वेळेससुद्धा कर्मचारी काळजी घेतात. आम्हाला कोणतीही काळजी वाटत नाही. - लक्ष्मीबाई बंदोरे, रा. मुक्रमाबाद (नातेवाईक)
दवाखान्यात सर्व कर्मचारी बाळाची योग्य काळजी घेत असले तरी भंडारा येथील घटनेमुळे मी आयसीयूत ठेवलेल्या बाॅळाच्या वार्डाजवळ मला ठेवण्यास सांगितले. नर्सनेसुद्धा व्यवस्था केली. त्यामुळे आता चिंता नाही. - प्रतीक्षा लांडगे, काबरानगर (आई)
रुग्णालयातील आयसीयू वाॅर्डात आम्ही पूर्वीपासून सर्व बाबींकडे लक्ष ठेवून असतो. या ठिकाणच्या मशीनची, वायरिंगची आम्ही महिन्याला तपासणी करतो. तसेच विविध उपक्रम राबविणे, स्वच्छता, या गोष्टीलाही अधिक महत्त्व दिले जाते. रुग्णालयाची इमारत जुनी असल्याने यासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडे कळविले आहे. - डाॅ. संगेवार, रुग्णालयप्रमुख, स्री रुग्णालय