हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आडा येथील रहिवासी शंकर चंद्रवंशी यांना दम्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाने १५ एप्रिल २०२१ रोजी दाखल केले होते. सदरील रुग्णाची दोन दिवसांनी ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार नांदेड येथे पुढील उपचारासाठी नेत असताना रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर मयताचा मुलगा सदाशिव ऊर्फ अनिल शंकर चंद्रवंशी, सुनील शंकर चंद्रवंशी रा. निवघा बाजार, तसेच संदीप संभाजी जाधव रा. कोळी व बालाजी शिवदास चंद्रवंशी रा. आडा या चौघांनी मिळून हदगांव येथील सरकारी दवाखान्यात येऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी धारबा काशीराम नाईक यांच्याशी वाद करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशा स्वरूपाची फिर्याद वैद्यकीय अधिकारी नाईक यांनी हदगाव ठाण्यात दिली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे संबंधित चारही आरोपींनी ॲड. सुधाकर पाटील सावरगांवकर यांच्यामार्फत जिल्हा सत्र न्यायालय, नांदेड येथे नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जावर ४ जून २०२१ रोजी सुनावणी घेण्यात आली. सदरील प्रकरणात सरकारी पक्ष व आरोपी अशा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन चारही आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटींसह जामीन मंजूर केला आहे. सदरील प्रकरणात सर्व चारही आरोपींच्या वतीने ॲड. सुधाकर पाटील सावरगांवकर यांनी कायदेशीर बाजू मांडली आहे.
शासकीय कामात अडथळा प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:22 AM