हदगाव : एसबीआय बँकेसमोर अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सकाळी नऊ वाजल्यापासून रांगेत थांबले पण दुपारपर्यंत कनेक्टिव्हीटीच नसल्याने पदरमोड करीत परतावे लागले. बाजूला असलेल्या सेवाकेंद्रात दहा हजार रुपये काढण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत.
रविवारी सुट्टी झाल्याने सोमवारी पैसे काढणे भरण्यासाठी चांगला दिवस समजला जातो. ग्रामीण भागातील मनाठा, सावरगाव, बरडशेवाळा, पिंपरखेड, तळणी, कोहळी आदी गावातील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या पाल्य किंवा पत्नीसह सकाळीच बँकेसमोर रांगेत पैसे काढण्यासाठी थांबले पण बँक सुरू होऊन लंच टाईम झाला तरी संगणक सुरुच झाले नाही. त्यामुळे गुरुजी मंडळी ग्रामसेवक वैतागून गेले होते. वयोमानाने अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलेले त्यात कोरोनाची भीती पण पोट कसे थांबणार मग मिळणारे पेन्शन घेण्यासाठी ही मंडळी आज मोठ्या प्रमाणात बँकेसमोर उभी होती. ज्येष्ठ नागरिकांना बँकेत बसण्यासाठीही परवानगी नाही. पिण्याचे पाणी नाही.
काही ग्राहकांनी सेवा केंद्रात पैसे उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांना दहा हजार रुपये काढण्यासाठी शंभर रुपयांची मागणी करण्यात आली. नाईलाजस्तव ते तयार झाले. पण त्यांचा अंगठा निशाण उमटत नसल्यामुळे त्यांना पैसे उचलता आले नाही. लंच टाईमपर्यंत मेकॅनिकल बोलावण्यात आले नव्हते. बँकेचे काही काम ढेपाळले की ते करण्यासाठी कनेक्टिव्हीटी नसल्याचे सांगून अंतर्गत कामे उरकून घेण्यात येत असतात असे एक व्यापारी म्हणाला.
अनेकांना महिन्याकाठी चार पाच हजारांचे औषधी खर्च करावा लागतो. आता उद्या भारत बंद असल्याने त्यांना एक दिवस पुन्हा थांबावे लागणार आहे. मी पत्नीसह सकाळी नऊ वाजता थंडीतच आलो. लवकर नंबर लागावा म्हणून पण येथे दिवसभर थांबूनही फायदा झाला नाही. खाली बसावे लागते. नाहीतर उभेच टाकायचे -शंकरराव नरवाडे (सेवानिवृत्त मु अ.) चुंचा
मला तीन बाॅल्केज आहेत. थोडीही वदवद जमत नाही. वय झाल्यामुळे चेकबुक दिले नाही. एटीएमपण नाही. दर महिन्याला यावे लागते -एस.एस.चौरे, मनाठा (सेवानिवृत्त मु अ.मनाठा)
वरुनच कनेक्टिव्हीटी नाही. आम्ही काय करणार? आता दुरुस्तीसाठी कारागीर बोलावले सुरू झाले की वाटप करु -चौधरी, शाखा अधिकारी एसबीआय हदगाव