याठिकाणी अनेक वर्षांपूर्वी करण्यात आलेली वॉटर सप्लाय योजना असून, ती अनेक ठिकाणी लीक झाली आहे, तर अनेक जागी मोडकळीस आली असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत; परंतु या जुन्याच वाॅटर सप्लाय योजनेंतर्गत गावाला पाणीपुरवठा मिळत असल्याने मुख्यमंत्री पेयजल योजनेचा प्रस्ताव गुलदस्त्यातच आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मंत्रालय स्तरावर पेयजल योजनेचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळाली आहे.
सद्य:स्थितीत बारड बारा ते पंधरा हजार लोकवस्तीचे गाव झाले आहे; परंतु जुन्याच वॉटर सप्लाय योजनेंतर्गत सप्लाय होणारा पाणीपुरवठा हा सुरळीतपणे, तसेच लीक असलेल्या पाइपलाइनअंतर्गत होत असल्याने अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत, तसेच लीक असलेल्या पाइपलाइनअंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा ग्रामस्थांना मिळत नसल्याची ओरड सध्या सुरू आहे. अनेक वेळा लीक असलेली पाइपलाइन जोडताना अनेक समस्या निर्माण होतात. ज्या ठिकाणी पाइपलाइन लीक झाली त्याठिकाणी वेळेत जोडणीकाम होत नसल्याने व जागेवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ही पाइपलाइन जोडण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी जात आहे. त्यामुळे याठिकाणी वाॅटर सप्लाय योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे.
हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. शासनस्तरावर या प्रस्तावासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता असून, ग्रामस्थांना शुद्ध पाणी देण्याची गरज आहे. बारड येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी वाॅटर सप्लायची पाइपलाइन फुटली आहे. अनेक ठिकाणी लीक झालेली पाइपलाइन तशीच आहे. त्यामुळे वाॅटर सप्लायच्या पाइपलाइनअंतर्गत पाणी कसे येत असेल, यावर विचार करण्याची गरज आहे, तर पाणी नमुने तपासण्याची गरज असून, प्रशासकीय यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोट
बारड येथील जुनी वाॅटर सप्लाय पाइपलाइन मोडकळीस आली असून, अनेक ठिकाणी लीक होत आहे, तर मेंटेनन्स वाढले असल्याने अनेक समस्या निर्माण होत असून, नवीन वाॅटर सप्लायसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत अनेक दिवसांपूर्वी ग्रामपंचायतअंतर्गत प्रस्ताव दाखल केला असून, तो मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहे.
-अनुप श्रीवास्तव, ग्रामविकास अधिकारी, बारड