अध्यक्षपदी बामणे
उमरी - बच्चू कडू प्रणित प्रहार दिव्यांग संघटनेच्या उमरी तालुकाध्यक्षपदी संगीता बामणे यांची निवड झाली. नांदेड येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.या निवडीबद्दल बामणे यांचे अनेकांनी स्वागत केले.
धबडगे यांच्या भेटी
देगलूर - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलूरचे पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे देगलूर हद्दीतील गावांना भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. गुरुवारी धबडगे यांनी बागवान टाकळी, खानापूर, तडखेल, अल्लापूर, इब्राहीमपूर, वन्नाळी, सुगाव, वझरगा आदी गावांना भेटी दिल्या होत्या.
रातोळीकरांना निवेदन
लोहा - बिंदू नामावलीनुसार रिक्त नसलेल्या प्रवर्गातील शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदल्या होण्यासाठी पाचव्या टप्प्यातील अंतरजिल्हा बदली प्रक्रिया पोकळ बिंदूवर व्हावी व संगणक अर्हता मुदतवाढ मिळावी या मागणीचे निवेदन पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आ.राम पाटील रातोळीकर यांना देण्यात आले. यावेळी राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव मांडगे, जिल्हा उपाध्यक्ष जी.बी. मोरे, एम.डी.पेटकर, जिल्हा संघटक लक्ष्मीकांत कोंडावार आदी उपस्थित होते.
ट्रकची कारला धडक
अर्धापूर - वेगातील ट्रकने कारला धडक दिल्याची घटना २२ डिसेंबर रोजी रात्री हिरकणी रोपवाटीकेसमोर घडली. हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील गजानन वाघमारे हे कारने जात असताना एम.एच.२६-ई- ३५६६ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात कारचे नुकसान झाले. सहाय्यक फौजदार पानपट्टे तपास करीत आहेत.
विवाहितेचा छळ
देगलूर - माहेराहून १० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केल्याच्या आरोपावरून देगलूर पोलिसांनी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा नोंदविला. १७ ते २० जून २०२० यादरम्यान हा प्रकार घडल्याचे विवाहितेने फिर्यादीत नोंद केले. पोलीस नायक पल्लेवाड तपास करीत आहेत.
सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण
लोहा - शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील माऊलीनगर ते जुना लोहा दरम्यान सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले. कामावर ३६ लाख रुपये खर्च झाले. नगरसेवक संभाजी चव्हाण, यांनी याकामी पाठपुरावा केला होता.
तालुका शिबीर
नांदेड - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ९ तालुक्याच्या ठिकाणी जानेवारी ते जून २०२१ या कालावधीतील तालुका शिबीर आयोजित करण्यात आले आहे.वाहन चालकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
अवैध दारू जप्त
मांडवी - परिसरातील काझीपेठ, डावरला येथे पोलिसांनी छापा टाकून साडेतीन हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली. पोलिसांनी यातील एका व्यक्तीलाही पकडले. फौजदार जमाखान पठाण यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पोलीस कर्मचारी अस्वले तपास करीत आहेत.
ऑटो जाळला
लोहा - माळाकोळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाताळगंगा येेथे ऑटोरीक्षा जाळण्यात आल्याची घटना घडली. यात ऑटोचे दीड लाखांचे नुकसान झाले. दिलीप मुंडे यांचा हा ऑटो होता. माळाकोळी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
पुस्तिकेचे प्रकाशन
बिलोली - राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बिलोली तहसील कार्यालयात माहिती व कार्यदिशा या पुस्तकाचे प्रकाशन तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.गोपाळ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजू लाभशेटवार, सचिव माधव फुलारी, साईनाथ अरगुलवार, नायब तहसीलदार निलावाड, ओमप्रकाश गौंड, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार आर.बी. चव्हाण उपस्थित होते.