गौतम लंके।कासराळी : उपद्रवी, कत्तलीच्या तावडीतून सुटलेल्या, भाकड, निराश्रित अशा शंभरहून अधिक गो-धनाला कासराळीत स्वयंसेवी संस्थेमुळे आधार मिळाला आहे़ जवळपास ११ एकर जमीन वैरणासाठी राखून दिमतीला ५ मजुरांची निरंतर सेवा गत ४ वर्षांपासून सुरु आहे़ विशेष म्हणजे, संस्थेच्या मालकीचे एकही गो-धन या गोशाळेत नाही.कासराळी येथील जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांच्या सरस्वती प्रतिष्ठान ह्या सेवाभावी संस्थेने गो-धनांच्या या सेवेचा श्रीगणेशा २४ डिसेंबर २०१५ साली आपल्या स्वत:च्या शेतीतच केला. हा उपक्रम हाती घेताना गोधनांची सेवा हाच एकमेव उद्देश ठेवण्यात आला होता़ आताही त्याच पद्धतीने येथे गोधनांची सेवा केली जाते. कासराळी येथील ग्रामपंचायतींनी उपद्रवी गायींना येथील संस्थेच्या स्वाधीन केले. तद्नंतर येथे गो-धनांची संख्या कमालीची वाढली़ ज्यामुळे आता याला गोशाळेचे स्वरुप आले आहे. बेळकोणी, चिंचाळा, कासराळी येथील उपद्रवी, भाकड गाई या संस्थेला दिल्या. साधारणत: २ वर्षांपूर्वी कत्तलीसाठी जाणाऱ्या गाई बिलोली व कुंडलवाडी येथील पोलिसांच्या सतर्कतेने सुटल्या होत्या़त्या गायींना येथील गोशाळेत संगोपनासाठी सोडण्यात आले होते. सध्या येथे ११२ गो-धन असून ज्यात ७० गाई, ३७ कालवडी, ५ बैल आणि एक वळू आहे़संस्थेने या गो-धनास ऊन, पाऊस आणि थंडी याचा कुठलाही परिणाम होणार नाही यासाठी शेड उभारले आहे़ कडबा, चारा व कुरणासाठी ११ एकर जमीन संस्थेने गत चार वर्षांपासून राखून ठेवली. त्यामुळे अगदी उन्हाळ्यातही हिरवागार चारा उपलब्ध झाला.गो-धनाच्या देखभालीसाठी ५ मजूर संस्थेने ठेवले असून मजुरांकरवी चारा, शेण काढणे, झाडलोट व स्वच्छता केली जाते. कडबा व चारा कापण्यासाठी विजेवरील यंत्रे आहेत. तेलंगणातून ऊस व मक्याचे वैरण खरेदी आणले जाते. येथे दुधाळ गायींचे दूधदेखील काढल्या जात नाही़सेवाभावातून चार वर्षांपासून गोशाळा सुरुशासनाचा एक छदामही या संस्थेने घेतला नसून गत चारा वर्षांपासून निरंतर ही सेवा चालू आहे. भाकड गो-धनापैकी एखादी गाय दगावल्यास येथे तिच्यावर अंत्यसंस्कारासाठी संस्थेने जागा राखून ठेवली आहे. या उपक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी भेटी दिल्या आहेत़
गोशाळेमुळे भाकड, निराश्रित गो-धनाला मिळाला हक्काचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:34 AM
उपद्रवी, कत्तलीच्या तावडीतून सुटलेल्या, भाकड, निराश्रित अशा शंभरहून अधिक गो-धनाला कासराळीत स्वयंसेवी संस्थेमुळे आधार मिळाला आहे़
ठळक मुद्देसरस्वती प्रतिष्ठानचा उपक्रम ११ एकरवरच्या गोशाळेत ११२ गो-धन