- विशाल सोनटक्के
नांदेड : मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या दिवसात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती असून, २ मेपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ५८ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता आरोग्य विभागानेच वर्तविली आहे. रुग्णवाढीमुळे आयसोलेशन, ऑक्सिजन आणि आयसीयू खाटासह व्हेंटीलेटर्स कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्र अनुभवत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, मृत्यूदरही वाढलेला आहे. आरोग्य विभागाने ज्या पाच जिल्ह्यांच्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेडचा मृत्यूदर मागील आठवड्यात १.८२ टक्केवर गेला होता. साप्ताहिक पॉजिटीव्हीटीमध्येही उस्मानाबादसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. उस्मानाबादचा सर्वाधिक ३९.२५ टक्के पॉजिटीव्हीटी रेट होता. तर परभणी ३६.७८ आणि हिंगोलीचा रेट ३६.७० असा आढळला आहे. या तीनही जिल्ह्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच येणाऱ्या दिवसात मराठवाड्यातील सक्रिय रुग्ण संख्या सध्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून २ मेपर्यंत हा आकडा १ लाख ५८ हजाराच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसे झाल्यास आयसोलेशन ऑक्सिजन, आयसीयूसह व्हेंटीलेटर्सचीही मोठ्या प्रमाणात कमतरता पडू शकते. आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार रुग्णवाढ झाल्यास मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात १७ हजार ७०० आयसोलेशन खाटा कमी पडतील. तर ८ हजार ६३० ऑक्सिजन खाटासह ११४५ आणखी आयसीयू खाटांची गरज भासू शकते. याबरोबरच २०९ व्हेटीलेटर्स आणखी उपलब्ध करावे लागणार आहेत. आरोग्य विभागाने वर्तविलेला हा अंदाज पाहता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आणखी आरोग्य सुविधा वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
रुग्णवाढीचा असा आहे अंदाज...राज्याच्या आराेग्य विभागाने मराठवाड्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ मेपर्यंत सुमारे १ लाख ५८ हजारांच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तविला आहे. २ मे रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ३० हजार ७३१ असण्याची शक्यता आहे. तर जालना १५ हजार ९५६, बीड १९ हजार ५३६, लातूर ३६ हजार ८९८, परभणी २२ हजार ६३९, हिंगोली ४ हजार ४१९, नांदेड २८ हजार ४० तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ मेपर्यंत १० हजार २७७ पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
सध्याच ऑक्सिजनसह आयसोलेशन खाटा फुल्ल...मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण आयसोलेशन खाटांच्या १७९.३६ टक्के वापर होत आहे. परभणी १४४.९२, हिंगोली ७९.५०, औरंगाबाद ७३.०४, बीड ४६.६७, उस्मानाबाद ४६.२२, लातूर ४४.९३ तर जालना जिल्ह्यातील २७.२८ टक्के आयसोलेशन खाटा भरलेल्या आहेत. हिंगोलीत एकूण खाटांच्या तुलनेत १२६.६७ टक्के व्हेंटीलेटर्स वापरले जात आहेत. तर औरंगाबाद १०४.५७, लातूर ७४.७७, जालना ६०.१६, उस्मानाबाद ४७.६६, बीड १७.३३ तर नांदेड जिल्ह्यात एकूण खाटांच्या तुलनेत १५.३८ टक्के व्हेंटीलेटर्सचा वापर करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार उपाययोजनाराज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविडची सद्यस्थिती दर्शवत पुढील दिवसांतील अंदाज व्यक्त करणारा अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी सुचविल्याप्रमाणेच सध्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आरोग्य साधनांची स्थिती काय आहे, हे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन, आयसीयू आणि आयसोलेशन बेडची संख्या वाढविली आहे. ग्रामीण भागात काही नव्या कोविड सेंटरचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला असून, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मात्र आरोग्य मंत्र्यांनी सांगितल्यानुसार पुढच्या काही दिवसात तोही सुरळीत होईल. - डॉ. विपिन ईटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड.