नांदेड : आजघडीला मोबाइल, टीव्ही या अत्यावश्यक वस्तू झाल्या आहेत. त्याच्या अतिवापरामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. आजकाल तर घरात जेवण करतानाही अनेकांना मोबाइल किंवा टीव्ही पाहिल्याशिवाय घास उतरत नाही. परंतु अशा प्रकारे टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने पोटाचा घेर वाढून पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्याऐवजी शांतपणे अधिकवेळा चावून ग्रहण केलेले अन्न पचन लवकर होते.
सध्या अनेक जणांचा फास्ट फूड खाण्याकडे ओढा असतो. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मात्र जिभेचे चोचले असलेल्यांची मोठी गैरसोय झाली. परंतु घरपोच डिलिव्हरीचा त्यांनी लाभ घेतला. आता मात्र सर्वच हॉटेल, रेस्टॉरंट खुले झाले आहेत. फास्ट फूड आणि तेलकट पदार्थांमुळेही पोटाचा घेर वाढतो. बदललेल्या जीवनशैलीमुळेही अनेकांना पोटाचे विकार होत आहेत. अवेळी जेवण, पुरेशी झोप नसणे यासह इतर कारणांमुळे पोटविकारांना आमंत्रण मिळते.
तेलकट पदार्थांचे अधिक सेवण करणे घातक आहे. त्याचबरोबर जेवणाच्या वेळा पाळण्याची गरज आहे. नाश्ता आणि जेवणामध्ये अंतर ठेवावे. सूर्य मावळण्यापूर्वी रात्रीचे जेवण घेतल्यास ते अधिक उत्तम असते. जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यानेही पोटविकार होतात.
शरीराला कोणत्याही प्रकारच्या कष्टाची कामे करण्याची सवय नसणे. नियमित व्यायाम किंवा योगा याकडे दुर्लक्ष केल्यानेही पोटाचा घेर वाढतो. दूषित पाणीही त्यासाठी एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे जेवणात काय खावे याचा सल्ला घेण्याची गरज आहे.
सकाळचे आणि रात्रीचे जेवण याच्या वेळा ठरवून घ्याव्यात. दोन जेवणातील अंतरात फळांचे सेवन करावे. भूक लागली म्हणून कितीही खाऊ नये. आहार संतुलित असावा. शक्यतो उकडलेले अन्न अधिक घ्यावे. जेवणानंतर लगेच झोपू नये. अन्न पचनासाठी काही तासांचा वेळ लागतो. नियमित व्यायाम केल्यास पोटविकार कमी करण्यास मदतच होते.