नांदेड : भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्याकासह बहुजन समाजावरील अन्यायात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन माजी मंत्री आ. मोहंमद आरिफ नसीम खान यांनी केले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी अन्यथा या विभाजनाचा भाजपालाच फायदा होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.नसिम खान हे शनिवारी नांदेडमध्ये काँग्रेस प्रचारार्थ आले होते. नवामोंढा येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या ध्येयधोरणावर त्यांनी कडाडून टीका केली. गेल्या पाच वर्षांच्या काळात केंद्र आणि राज्यात भाजप सरकारने अल्पसंख्याक समाजावर मोठा अन्याय केला आहे. त्याचवेळी दलित, ओबीसी, मागासवर्गीय समाजावरही हीच परिस्थिती होती. त्यामुळे अल्पसंख्याकांसह दलित, बहुजन हे काँग्रेससोबत असल्याचा दावाही नसीम खान यांनी केला.वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करुनही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घेतला नाही. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असली तरीही त्याचा काँग्रेसवर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. त्याचवेळी बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून आरएसएस बाबत चुप्पी साधली आहे. दुसरीकडे काँग्रेसवर मात्र टीका केली जात आहे. केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार आरएसएस चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर शादीखाना योजना, उर्दू घरांची संकल्पना बंद केली आहे. मुस्लिम समाजातील अनेक बिरादरींचे आरक्षण रोखले आहे. मुस्लिम आणि मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले होते. तरीही मुस्लिमांना आरक्षण दिले नाही. धनगर समाज भाजपासोबत होता. मात्र आरक्षणाच्या विषयावरुन तो आता भाजप सरकारवर नाराज आहेत. या परिस्थितीत भाजपाला धडा शिकविण्याच्या तयारीत मतदार दिसून येत आहेत. मात्र मतदान करताना पुरोगामी धर्म निरपेक्ष विचारांच्या मतांचे विभाजन होणार नाही आणि याचा फायदा पुन्हा जातीयवादी शक्तींना मिळणार नाही, याची दक्षता घ्या, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला लियाकत अन्सारी, अब्दुल हाफीज, जमी कुरेशी, सलाम चावलवाला, स्थायी समितीचे सभापती फारुख अली खान, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजीब आदींची उपस्थिती होती.
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:49 AM
भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्याकासह बहुजन समाजावरील अन्यायात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन माजी मंत्री आ. मोहंमद आरिफ नसीम खान यांनी केले.
ठळक मुद्देआरिफ खान यांचे आवाहन