नांदेड : मेडिकलला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून बनावट साईट आणि बनावट कागदपत्रे तयार करून विश्वास जिंकत एका शिक्षकाला दहा लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे. या प्रकरणात बंगळुरूच्या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दत्ता लक्ष्मण खानझोडे (रा. विजयनगर ) यांच्या मुलाला वैद्यकीय कॉलेजला विशेष कोट्यातून प्रवेश मिळवून देतो म्हणून दोघांनी मोबाईलवर संपर्क साधला. त्यानंतर बी.आर. आंबेडकर महाविद्यालयाच्या नावाने बनावट लेटरहेड तसेच बनावट साईट सुरू केल्या होत्या. त्याबाबत खानझोडे यांचा विश्वास जिंकण्यासाठी वेळोवेळी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे पाठविण्यात आली. त्यानंतर खानझोडे यांनीही मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल या आशेने दोन वेळेस आरोपींच्या खात्यावर पाच-पाच लाख रुपये टाकले.
परंतु, काही दिवसांनंतर आरोपींनी खानझोडे यांना फोन करणे बंद केले. तसेच आपले मोबाईलही स्विच ऑफ केले. खानझोडे यांनी साईट तपासल्या असत्या त्याही बंद होत्या. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अभिषेक रंजन आणि हरीश जैन, दोघे रा. बंगळुरू यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि. डोके करीत आहेत.