किनवट - किनवट तालुक्यात मागील पाच दिवसांत चार शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडल्या असून, शेतात जागलीला राहणारे शेतकरी, सालगडी भयभीत झाले आहेत.
३० च्या मध्यरात्री घोटी येथील एका तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले. सुुदैैवाने जीवित हानीची कोणतीही घटना घडली नाही. २६ जानेवारी रोजी एकाच दिवशी पिंपळगाव येथील काशीराम सलाम (६०)व गोविंद सलाम (५५) या दोघा शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला करून तर ३० जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दहेली येथील व्यंकटी सामसेनवार (४५) यांचेवर हल्ला करून जखमी केले. त्याच मध्यरात्री घोटी येथील निखिल सुरवशे (२४) या तरुण शेतकऱ्यावर झोपेत असताना हल्ला करून किरकोळ जखमी केले होते.
घोटी येथील घटना तर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शेतात घडल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागल्याचे चित्र आहे. वन विभागाने जंगलात पाणवठे तयार करावेत व त्यांना खाण्यासाठी व्यवस्था करावी, म्हणजे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येणार नाहीत. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चार महिन्यांतच अस्वले गावाच्या दिशेने येतात. कारण या काळात बोरीचा सिझन असतो. बोरे खाण्यासाठी अस्वल येतात, तसेच याच काळात ते पिलांना जन्म देतात. पिले सुरक्षित राहावीत म्हणून कापूस पिकाच्या आडोशाला शेतात येतात, तसेच त्यांना डिवचले तर ते मानवावर अटॅक करतात, असे मांडवीचे वनक्षेत्रपाल योगेश शेरेकार यांनी सांगितले. जर आरडाओरड केली नाही तर ते निमूटपणे निघून जातात, असा अनुभव शेरेकार यांनी बोलून दाखविला. रात्री मी गस्तीवर असताना रात्रभर जंगली जनावरे शेतात येऊ नये म्हणून ओरडणारे शेतकरी पाहिले व पीक नुकसानीची प्रकरणे घेऊन आले तेंव्हा मी वरिष्ठांना सांगून हाच आवाज रेकॉर्ड करून मोठा साऊंड व स्पीकर देण्याचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने शामा प्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत चार कमिट्या मंजूर करून घेतल्या, प्रायोगिक तत्त्वावर उनकदेव, बोथ टिटवी, परशुराम नाईक तांडा व उमरी येथील समित्यांना आवाज रेकॉर्ड करून आवाज स्पीकर ब्लुटूथवर वाजवण्यासाठी देण्याचे विचाराधीन असल्याचेही शेरेकार यांनी सांगितले.