निवडणुकीच्या कारणावरुन जबर मारहाण
नांदेड - ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीला उभे करु नको, अशी धमकी महिन्याभरापूर्वी दिल्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी एका माजी सैनिकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुदाम माधवराव मस्के हे माजी सैनिक आहेत. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीला उभे केले होते. यावेळी आरोपीने मस्के यांच्या पत्नीला निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले होते तसेच मारहाण करण्याची धमकीही दिली हाेती. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता मस्के हे उत्तम गुरुजी यांच्या घरासमोर उभे असताना, आरोपी त्याठिकाणी आला व त्याने दगडाने मस्के यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मस्के हे जखमी झाले असून, त्यांनी माळाकोळी पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल किरपणे करत आहेत.
चौकी मिरवणूक प्रकरणात गुन्हा
नांदेड - शहरातील पंजाब भवन परिसरातून विनापरवानगी चौकी मिरवणूक काढून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मिरवणुकीत दुचाकी रॅली काढण्यात आली होती. दुचाकीचे सायलेंसर बदलून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर लावण्यात आले होते. तसेच सोशल डिस्टसिंगचेही पालन करण्यात आले नव्हते. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.
दुसऱ्यांदा बोहल्यावर, कंधारात गुन्हा दाखल
नांदेड - पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये असताना दुसरा विवाह करुन कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करणाऱ्या पतीविरोधात कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी पीडित महिलेसोबत आरोपीने विवाह केला होता. आरोपीला पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये होती, ही बाब त्याने लपवून ठेवली. तसेच सासरी नेण्यासही तो वेळोवेळी नकार देत होता. कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन यावेत, यासाठी पत्नीला मारहाणही केली. पीडितेला पहिल्या लग्नाची माहिती समजल्यानंतर तिने कंधार पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल चोपडे करत आहेत.