नांदेड : मराठवाड्यातील जनतेचे आराध्य दैवत असलेल्या माळेगाव येथील श्री म्हाळसाकांत तथा खंडोबा यात्रेला मंगळवारी देवस्वारी व पालखी पूजनाने प्रारंभ झाला़ ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा गजर करीत हजारो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले़ राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे यात्रेच्या पहिल्याच दिवशी माळेगाव परिसर फुलून गेला होता़
दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाली. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात बेल, भंडारा, खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. दुपारी दोन वाजता देवस्वारीचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगाकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. मोहनराव हंबर्डे, जि. प. उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती समाधान जाधव आदींची उपस्थिती होती.
पालखीच्या मानकऱ्यांचा गौरव : शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक (रिसनगाव), नागेश गोविंदराव महाजन (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशालराव भगवानराव भोसीकर (पानभोसी) व गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी) यांचा मानाचा फेटा बांधून गौरव करण्यात आला.