नांदेड : पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक जीवघेणी ठरल्यानंतर आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत.
जिल्ह्यात आजघडीला पाच ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले असून आणखी १७ ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत जवळपास २२ ऑक्सिजन प्लांट होतील. त्यामुळे नांदेडहून इतरही जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेद रुग्णालय आणि श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात खाटा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिसरी लाट आली तरी, खाटा कमी पडणार नाहीत याची तयारी करण्यात आली आहे. व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेडची संख्याही दुसऱ्या लाटेतच मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली होती. तिसरी लाट दरवाजावर येऊन ठेपल्यामुळे प्रशासनाने रखडलेली कामे तातडीने हाती घेतली आहेत.
पाच ऑक्सिजन प्लांट तयार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मागणी होती ती ऑक्सिजनला. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर गळतीमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या. नांदेडात मात्र प्रशासनाने योग्य नियोजन केल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला नाही. नांदेडने शेजारील जिल्ह्यांनाही ऑक्सिजन पाठविले. सध्या जिल्ह्यात पाच ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. तर १७ ऑक्सिजन प्लांटचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या काही दिवसांत हे सर्व प्लांट सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे.
ऑक्सिजन बेड वाढविले
विष्णूपुरी आणि शहरातील जिल्हा रुग्णालय तसेच आयुर्वेदिक रुग्णालयात प्रशासनाने ऑक्सिजन बेडच्या संख्येत वाढ केली आहे. त्याचबरोबर व्हेंटीलेटरही दुसऱ्या लाटेत खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत साधनांचा तुटवडा जाणवणार नाही.