सामाजिक समतेचा संदेश, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक साहाय्य म्हणून समाजकल्याण विभागातर्फे ‘आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना’ राबविण्यात येते. या योजनेसाठी म्हणावे तसे प्रस्ताव प्राप्त होत नसल्याचे समोर आले आहे. गत तीन वर्षांत केवळ ३८ जोडप्यांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्यांना मार्च २०२० मध्येच अनुदान वाटप करण्यात आले. २०१७, २०१८, २०१९ या वर्षांतील प्रस्ताव अनुदानापासून वंचित होते. दोन वर्षे या योजनेसाठी असलेला निधी प्राप्त झाला नव्हता. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने पाठपुरावा केल्यानंतर २०२० मध्ये गत तीन वर्षाचा रखडलेला निधी प्राप्त झाला.
योजनेचा लाभ अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांपैकी एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती सवर्ण धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येते. अनुसूचित जाती, जमाती यांपैकी एका व्यक्तीने सवर्ण धर्मातील व्यक्तीशी विवाह केला तर ते अनुदानास पात्र ठरतात. या योजनेअंतर्गत ५० हजारांचे अर्थसाहाय्य देण्यात येते.
-----------------------
चौकट - मागील तीन वर्षांचे रखडलेले अनुदान आंतरजातीय विवाह करणाऱ्या ३८ जोडप्यांना वाटप करण्यात आले आहे. कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वीच सदरील अनुदान संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.
- माळवदकर, समाजकल्याण अधिकारी, नांदेड.