नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे मोठ्या शहरात असलेले युवक गावी परतले आहेत. हाताला पडेल ते काम करीत आहेत. अशा युवकांना हेरून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून नोकरी देण्याचे आमिष दाखवून गंडविण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. नोकरी मिळविण्यासाठी नोंदणी शुल्क व इतर कागदपत्रांचा खर्च म्हणून तरुणांकडून काही रक्कम उकळली जात आहे. एकवेळेस पैसे खात्यावर जमा केल्यानंतर मात्र संबंधित मोबाईल क्रमांक बंद करण्यात येत आहेत. तरुणांना नोकरी मिळण्याची खात्री पटावी यासाठी अनेक नामांकित कंपन्यांचे बनावट लेटरपॅड, शिक्के यांसह इतर बाबींचा सर्रासपणे वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या तरुणांच्या संकटात या फसवणुकीच्या नव्या फंड्यामुळे वाढच होत आहे. सायबर सेलकडून अशा बनावट वेबसाईटवर लक्ष ठेवण्यात येते.
काही गुन्हेगार फेसबुक व इतर माध्यमांचा वापर करून अमुक ठिकाणी कंपनीत आकर्षक वेतन मिळेल, अशा प्रकारच्या जाहिराती करतात. त्यामध्ये संपर्कासाठी मोबाईल क्रमांक दिलेला असतो. बेरोजगार तरुण त्या मोबाईल क्रमांकावर किंवा वेबसाईटवर संपर्क साधतात. त्यानंतर तरुणांना नोंदणी शुल्क व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठरावीक रक्कम भरण्यास सांगितली जाते. त्यासाठी नामांकित कंपन्यांचे बनावट लेटरपॅडही दाखविण्यात येते. नोकरीची खात्री पटल्यानंतर तरुण त्या खात्यावर रक्कम जमा करतात. एकवेळेस रक्कम जमा झाल्यानंतर संबधित व्यक्ती पुन्हा प्रतिसाद देत नाही.