ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप
लोहा - लोहा तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी १९ एप्रिल रोजी आयोजित संपात सहभाग घेतला. राहणीमान भत्ता देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा, वसुलीची जाचक अट रद्द करावी, कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा आदी मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले होते.
सावरखेडा प्रतिबंधिक क्षेत्र
नायगाव - तालुक्यातील सावरखेडा येथे कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे तहसीलदार गजानन शिंदे यांनी गाव प्रतिबंधिक क्षेत्र म्हणून घोषित केले. तीन दिवसांत गावातील १७ जण बाधित आढळले होते. सात दिवसांत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी जी. के. बच्चेवार यांनी दिली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच जयश्री इजगिरे, उपसरपंच नारायण ढगे आदींनी केले आहे.
व्यापाऱ्यांना दंड
हदगाव - कोरोना प्रमाणपत्र नाही अशा दुकानदारांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. प्रभारी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मुख्याधिकारी एन.डी. जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश ढगे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सपोनि पांढरे, पालिकेचे सतीश देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यामध्ये ५१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
गळफास घेऊन आत्महत्या
हदगाव - तालुक्यातील येवली शिवारात ४५ वर्षीय मजुराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १८ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. सुभाष खिल्लारे असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळाले नाही. सहायक फौजदार के.आर. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
रामनवमी उत्सव रद्द
उमरी - जुन्या उमरी भागातील राम-सीता मंदिरातील रामनवमी उत्सव यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती पुजारी गणेश वैद्य यांनी दिली. दरवर्षी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावेळी कोरोनाने आडकाठी आणली. प्रशासनाच्या सूचनेनुसार उत्सव यावेळी रद्द करण्यात आला.