Bharat Jodo Yatra: नांदेड सज्ज! भव्य मंडपात एकाच डायनिंग टेबलवर पाचशे जणांचे जेवण
By शिवराज बिचेवार | Published: November 7, 2022 12:09 PM2022-11-07T12:09:16+5:302022-11-07T12:09:54+5:30
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
नांदेड: काँग्रेसचे राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी देगलूर मार्गे रात्री उशिरा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सोमवारी देगलूरलाच मुक्कामानंतर ही यात्रा मंगळवारी बिलोली तालुक्यातील शंकरनगर, रामतिर्थ भागात येईल. येथे यात्रेतील लोकांसाठी तब्बल १०० बाय २५० या ॲल्युमिनिअमचा वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. नागपूर येथील एका डेकोरेटरने हा मंडप उभारला आहे. त्यामध्ये तब्बल पाचशे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. यात्रा मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी नेते, कार्यकर्ते यांच्या राहण्याची आणि भाेजनाची व्यवस्था करण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. गोदावरी मानार पब्लिक स्कुलच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात व्हीआयपीसाठी ६० स्वतंत्र केबीनची व्यवस्था केली आहे. मंडप क्रमांक २ हा ६५ बाय १०० चा डायनिंग हॉल असून त्यामध्ये एकाच वेळी खुर्चीवर बसून ५०० जणांना जेवण करता येणार आहे. तसेच शंकरनगर येथे पाच ते सहा हजार जणांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. भोपळा येथे राहूल गांधी आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या कॉर्नर सभा होणार आहेत.
गादी, बेडशीट, उशी अन् पांघरण
सध्या कडक हिवाळ्याचे दिवस आहेत. सकाळी सहा वाजेपासून सुरु झालेली भारत जोडो यात्री रात्री साडे सात वाजेपर्यंत सुरु राहते. त्यानंतर कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे वॉटरप्रुफ मंडप उभारुन त्यामध्ये कार्यकर्त्यांना विश्रांतीसाठी ठराविक अंतरावर गादी, त्यावर बेडशीट, उशी आणि उबदार पांघरणाची व्यवस्था केली आहे.
राहूल गांधी ए कॅम्पमध्ये
पदयात्रेतील कार्यकर्ते आणि नेते यांच्या मुक्कामासाठी उभारण्यात आलेल्या कॅम्पला ए,बी आणि सी अशी नावे देण्यात आली आहेत. त्यात राहूल गांधी यांचा ताफा ए कॅम्पमध्ये राहणार आहे. त्यांच्या ताफ्यात एकुण पाचशे जणांचा समावेश आहे. देगलूर महाविद्यालय परिसरात असलेल्या बी कॅम्पमध्ये पाचशे व्हीव्हीआयपीची व्यवस्था असेल. तर सी कॅम्पमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहणार आहेत.