नांदेड : काॅंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या ‘भारत जाेडाे’ यात्रेचे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास देगलूर येथे आगमन होणार आहे. या यात्रेेच्या स्वागतासाठी नांदेड काँग्रेस सज्ज झाली असून, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेससह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नांदेडात मुक्कामी आले आहेत.
खा. राहुल गांधी यांची ‘भारत जाेडाे’ यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात येणार आहे. तेलगंणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या देगलूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला आणि महापुरूषांच्या प्रतिमांना अभिवादन करून यात्रेचे स्वागत होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, राहुल गांधी यांचे भाषण होईल. रात्री ९ वाजता देगलूर ते वन्नाळी गुरूद्वारापर्यंत पदयात्रा राहील. यावेळी राहुल गांधी यांच्यासह पदयात्री हातात पेटती मशाल घेऊन चालतील.
वन्नाळी येथील गुरूद्वारा यादगार साहिबजादे बाबा जाेरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर श्री गुरूनानक देवजी यांचे गुरूपुरब अरदास केली जाईल. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता वन्नाळी गुरूद्वारा येथून पदयात्रेला पुन्हा प्रारंभ हाेईल. दुपारी पदयात्रेसाठी वझरगा येथे राखीव वेळ आहे. दुपारी ३ वाजता खतगाव फाटा येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. सायंकाळी साडेपाच वाजता पदयात्रा भाेपाळा येथे पाेहाेचल्यानंतर काॅर्नर बैठक घेतील. बुधवारी सकाळी ५:४५ वाजता शंकरनगर रामतीर्थ येथून प्रारंभ होईल. नायगाव येथील दुपारचा वेळ राखीव असेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता नायगाव येथील कुसुम लाॅन्स येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. सायंकाळी साडेपाच वाजता खा. राहुल गांधी यांची कृष्णूर एमआयडीसी येथे काॅर्नर बैठक हाेईल.
गुरुवारी होणार नांदेड शहरात आगमन- गुरुवारी सकाळी पावणेपाच वाजता कापशी गुंफा येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. दुपारी चंदासिंघ काॅर्नर (नांदेड) येथे पदयात्रा पाेहाेचल्यानंतर वेळ राखीव आहे. पुढे दुपारी ३ वाजता नांदेड शहरातील देगलूर नाका येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. - ही पदयात्रा शहरातून नांदेडच्या नवा माेंढा मैदानावर पाेहाेचेल. याठिकाणी सायंकाळी खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा आणि रात्री पिंपळगाव महादेव येथे मुक्काम होईल. शुक्रवारी सकाळी ५:४५ वाजता पदयात्रेला दाभड येथून प्रारंभ हाेईल. - पदयात्रा काळात दुपारी पार्डी मक्ता येथील स्वामी फार्म हाऊस येथे राखीव. त्यानंतर दुपारी ३ वाजता चाेरंबा फाटा येथून पदयात्रेस प्रारंभ हाेऊन ही पदयात्रा हिंगाेलीकडे प्रयाण करणार आहे.
भारत जोडो यात्रेत तीन कॅम्पभारत जोडो यात्रेतील पहिल्या कॅम्पमध्ये खासदार राहुल गांधी, केंद्रीय पातळीवरील नेते असतील. ते सर्व सुविधा असलेल्या कंटेनरमध्ये मुक्काम करतील. कॅम्प नंबर २ हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असेल, त्याठिकाणी प्रदेश पातळीवर नेते राहतील. याठिकाणी १ हजार पदयात्रींची व्यवस्था केलेली आहे, तर कॅम्प क्रमांक तीनमध्ये पदयात्रींच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
भारत जोडो यात्रा लोकचळवळ बनली- अशोकराव चव्हाण‘भारत जोडो’ यात्रा ही एक लोकचळवळ बनली आहे. हा एकप्रकारे स्वातंत्र्याचा दुसरा लढा असून, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे सामान्यांना भेटत आहेत, त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. त्यातूनच ही यात्रा लोकचळवळ बनत गेल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. सामाजिक क्रांती घडविण्यात महाराष्ट्र अग्रेसर असून, भारत जोडो यात्रा निश्चित लोकशाही वाचविण्यासाठी क्रांती घडवेल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.