अशोक चव्हाणांबद्दलच्या वावड्यांना ‘भारत जोडो’ने दिला पूर्णविराम, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
By श्रीनिवास भोसले | Published: November 14, 2022 01:19 PM2022-11-14T13:19:41+5:302022-11-14T13:21:26+5:30
नांदेडच्याच नव्हे तर राज्यातून आलेल्या अधोक चव्हाण समर्थकांची ऊर्जा वाढविणारा ठरला आहे.
- श्रीनिवास भोसले
नांदेड : देश एकसंघ करण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने काँग्रेस कार्यकर्त्यांसह युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या वारंवार उठणाऱ्या वावड्यांनाही या यात्रेने पूर्णविराम मिळाला आहे. चव्हाण यांनी तन-मन-धनाने स्वत:ला झोकून घेत केलेले कार्य आणि ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याबद्दलच्या अपप्रचाराचा वारंवार घेतलेला समाचार केवळ नांदेडच्याच नव्हे तर राज्यातून आलेल्या चव्हाण समर्थकांची ऊर्जा वाढविणारा ठरला आहे.
जवळपास दीड हजार किमीचा पल्ला पार करीत भारत जोडो यात्रेचे देगलुर येथून महाराष्ट्रात आगमन झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ असे म्हणत राहुल गांधी यांनीदेखील महाराष्ट्रातील पदयात्रेचा प्रारंभ केला. नांदेड हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्हा परिषदेसह महापालिका, नगरपंचायती, पालिकेसह बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. अनेक वेळा सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत अशोकराव चव्हाण यांना हरवायचे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत युती केली. परंतु, मतदारांनी आजपर्यंत चव्हाण यांच्याच बाजूने कौल दिला आहे.
दिवंगत नेते शंकरराव चव्हाण तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार अशोकराव चव्हाण यांच्या रूपाने नांदेडला दोन वेळा मुख्यमंत्रिपदाची संधीही मिळाली आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अशोकराव चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदासह नांदेडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती. या काळात चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांसह शासकीय कार्यालयाच्या इमारती, नद्यांवरील पुलांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला; परंतु काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे गट-भाजपचे सरकार आले. मूळ शिवसेनेतील नांदेड जिल्ह्यातील एकमेव आमदार बालाजी कल्याणकर आणि खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. त्यानंतर अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. याबाबत भाजपच्या नेत्यांकडूनही दुजाेरा देत अशोकराव चव्हाण यांच्याविषयी अपप्रचार केला जात होता. याबाबत अनेक वेळा चव्हाण यांनी दुर्लक्ष केले.
परंतु, अपप्रचार वाढत राहिल्याने त्यांनी घराणं कोणतं, संस्कार कोणते असे वक्तव्य करीत भाजपप्रवेशाचा विषय खोडून काढला होता. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’मध्ये चव्हाण सक्रिय राहतात की केवळ औपचारिकता म्हणून नियोजन करतात, अशा चर्चांसह तर्कवितर्कांना उधाण आले होते; परंतु चव्हाण यांनी मागील महिनाभरापासून यात्रेच्या यशस्वितेसाठी दिवसरात्र एक करत मेहनत घेतली. त्यांनी जबाबदाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नेटाने पार पाडल्या. अनेकांनी पडद्यामागेच राहून चव्हाण यांच्या नेतृत्वात काम करण्यास प्राधान्य दिले. ध्ये नवचैतन्य : हजारोंनी स्वेच्छेने सांभाळली जबाबदारी.
सूक्ष्म नियोजन अन् प्रत्येक ठिकाणी स्वत: हजर
कॅम्प क्रमांक १, २ मधील भोजन, राहणे तसेच सभास्थळ, कॉर्नर बैठक आणि पदयात्रा मार्गावरील नियोजनावर चव्हाण हे वैयक्तिक लक्ष ठेवून होते. सभेपूर्वी ते स्वत: मंचावर जाऊन माईक, प्रकाश, आसनव्यवस्थेची पाहणी करत. तसेच कॅम्पमधील सुविधांचा अधूनमधून आढावा घेत होते. भारत जोडो यात्रेतील विराट जाहीर सभा नांदेडात पार पडली. या सभेच्या निमित्ताने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पहिल्यांदाच नांदेडात आले होते. त्यांनी मराठीत भाषण करीत भाजप नेत्यांचा समाचार घेत अशोकराव चव्हाण यांच्या नियोजनाचे कौतुक केले.
युवकांना मिळाली ‘वन टू वन’ चर्चेची संधी
काँग्रेसमध्ये युवकांना संधी मिळत नाही, काँग्रेसमध्ये नेता संस्कृती असल्याचे बाेलले जायचे; परंतु, या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून युवक काँग्रेससह एनएसयूआय आणि इतर युवकांनाही राहुल गांधी यांच्यासोबत वॉक करत वन टू वन बोलण्याची संधी मिळाली. तसेच यात्रेमध्ये युवकांना प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्येही युवकांना अधिक महत्त्व दिले जाईल, असे मानले जात आहे.