बिजूर( नांदेड) बिलोली तालुक्यातील बिजुर या छोट्याशा गावातील शेतकरी शिंनगारे कुटुंबीयांकडे चहा आणि भज्यांचा आस्वाद घेत खासदार राहुल गांधी यांनी या कुटुंबांला एक सुखद धक्का दिला. दरम्यान कुटुंबातील ज्येष्ठ आणि बच्चे कंपनीशी जवळपास दहा ते बारा मिनिटे संवादही साधला. त्यामुळे शिनगारे कुटूंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
भारत जोडो यात्रेचा आज नांदेड जिल्ह्यातील दुसरा दिवस होता. दुपार सत्रानंतर यात्रा शंकरनगरकडे मार्गस्थ झाली. दरम्यान यात्रा मार्गावर असलेल्या बिलोली तालुक्यातील बिजूर येथील शेतकरी हनुमंत शिनगारे यांचे घर आहे. जवळपास १२ ते १४ लोकांचं हे एकत्रित कुटुंब आहे. मंगळवारी सायंकाळी अचानक खा. राहुल गांधी यांच्या ताफ्यातील चार कर्मचारी शिनगारे कुटुंबीयांकडे आले आणि त्यांनी राहुल गांधीजी तुमच्याकडे चहा घेणार आहेत असे सांगितले. शिनगारे कुटुंबीयांनी लागलीच तयारीला सुरुवात केली. तेवढ्यात राहुल गांधी आले.
अंगणातच राहुल गांधी यांनी स्वच्छ हात- पाय धुवून घरात प्रवेश केला. सांजेची वेळ आणि घरापाठीमागील टेकडीवरील महादेव मंदिर असे वातावरण त्यांना अधिकच चांगले वाटत होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी छतावर जाऊया अशी विनंती केली. ते व त्यांच्यासोबत असलेले काही पदाधिकारी लगेचच घराच्या छतावर गेले. याठिकाणी ५ मिनिटे विश्रांती करून त्यांनी छतावरच चहा घेत त्यासोबत भज्याचा देखील आस्वाद घेतला. अंगणात म्हैस, गाय पाहून त्यांनी शेतकरी कुटुंबाचे कौतुक केले.
शिनगारे कुटुंबियांच्या सुनेने बनविला चहाशिनगारे कुटुंबीयांची सून मीना विठ्ठल शिनगारे यांच्या हाताने बनवलेल्या चहाचा आणि भाची उमाताई आकाश वरवटे (रा.ताकबीड) यांनी बनवलेल्या कांदा भज्याचे राहुल गांधी यांनी भरभरून कौतुक केले. तद्नंतर शिनगारे कुटुंबातील जेष्ठ हनुमंत शंकरराव शिनगारे यांच्यासह घरातील बच्चे कंपनीशी संवाद साधला. सर्वकाही व्यवस्थित आहे का? तुमच्या अडचणी काय अशी हिंदीतून विचारणा करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच येथील बच्चे कंपनीसाठी चॉकलेट आणि बिस्कीट त्यांच्यात काही वेळ रमले. राहुल गांधी यांची पदयात्रा ही गावातून जाणार असल्याने बिजुरवाशीय खुश होतेच. परंतु बिजूर येथील शिंनगारे कुटुंबियांकडे चहाचा आणि भज्यांचा आस्वाद घेतल्यामुळे कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही.