नांदेड: 'भारत जोडो यात्रा' दरम्यान आज सकाळी अटकली येथे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे ( ७५ ) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ते मुळचे नागपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात मंगळवारचा दुसरा दिवस. सकाळी साडे आठ वाजता वन्नली येथून या यात्रेला सुरवात झाली. यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे हे झेंडा तुकडीचे संचालन करत होते. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि जयराम रमेश यांच्या बरोबर पांडे चालत होते. हातात तिरंगा घेऊन चालत असताना अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, जयराम रमेश, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सध्या यात्रा विश्राती घेण्यासाठी थांबली आहे. यावेळी कॅम्पमध्ये पांडे यांचा मृतदेह श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता यात्रा पुन्हा मार्गस्थ होईल. यात्रा शांततेत निघेल यादरम्यान कोणत्याही घोषणा देण्यात येणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे.