नांदेड : आपल्या हातचे लाडू राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना खाऊ घालण्यासाठी एका मायमाऊलीने लेकीसह नांदेड गाठले. बुधवारच्या भारत जोडो पदयात्रेत (Bharat Jodo Yatra) त्या दोघी सहभागी झाल्या. रस्ताच्या दुतर्फा असलेल्या गर्दीला जिंकत ती राहुल गांधीपर्यंत पोहोचली. परंतु, गर्दीत मागे पडलेल्या आईजवळील लाडूचा डब्बा मात्र ती राहुल गांधी यांना देऊ शकली नाही.
जालना येथील करुणा हिवाळे ह्या त्यांची कन्या संजना आणि मुलासह नांदेडात पोहोचल्या. त्या केवळ राहुल गांधी यांना त्यांच्या हातचा बेसनाचा लाडू खाऊ घालण्यासाठी पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. हजारोंच्या गर्दीत माय-लेकी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहिल्या आणि सुरक्षा कठड्याने त्यांचे हे प्रयत्न अनेकवेळा निष्फळ गेले. परंतु, जिद्दीने करुणा हिवाळे यांची कन्या संजना राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचलीच... तिचे प्रयत्न आणि सातत्याने सुरू असलेली धडपड पाहून तिला सुरक्षा यंत्रणेतील एकाने आत घेतले. राहुल गांधी यांच्याजवळ पोहचल्याने तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
दरम्यान, राहुल गांधी यांनी तिला तू का सहभागी झाली अशी विचारणा केली, त्यावेळी तिने माझ्या आईने तुमच्यासाठी लाडू बनविले ते देण्यासाठी आलेय, असे सांगितले. तेंव्हा राहुल गांधी यांनी लाडु कुठयेत, असं विचारलं. तेव्हा तिने आईकडे म्हणत.... गर्दीत हरवलेल्या आईचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नजर फिरवली. परंतु, तोपर्यंत तिलाही सुरक्षा रक्षकांनी कठड्याच्या बाहेर काढले. संजनाची भेट झाली, पण, आईच्या हातचे लाडू राहुल गांधी यांना खाऊ घालण्याची इच्छा मात्र अपुरी राहिल्याची तिने व्यक्त केली.