सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक
By सुमेध उघडे | Published: November 10, 2022 06:47 PM2022-11-10T18:47:30+5:302022-11-10T18:51:22+5:30
राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी
नांदेड : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. दरम्यान, खा. सुळे यांच्या एका छोट्या कृतीने पदयात्रेत मोठा संदेश गेला आहे. यात्रेच्या मार्गात प्लास्टिक बॅगचा कचरा दिसताच नकळत खा. सुळे यांनी उचलून घेतला.
महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा राहुल गांधी नांदेडात घेणार असून, त्यांच्या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे. आज दुपारी पदयात्रा नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे नेते खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यात्रेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागाने यात्रेस आणखी बळ मिळाल्याचे चित्र होते. खा. सुळे आणि जयंत पाटील यांनी यात्रेकरुंसोबत संवाद साधला. खा. सुळे मनमोकळ्या संवादासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी होती. यात्रा शिवाजी नगर येथे आली असता खा. सुळे यांना समोरील मार्गात प्लास्टिकचा बॅगचा कचरा दिसला. सर्वजण त्यावरून जात असताना खा. सुळे यांनी ती बॅग खाली वाकून उचलली. खूप गर्दी असतानाही रस्त्यात पडलेला कचरा दिसताच एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडत त्यांनी सहज प्लास्टिक बॅग उचलली. त्यांच्या या छोट्या कृतीने सहभागी सर्वांना मोठा संदेश दिला आहे. साधेपणासोबत खा. सुळे यांच्या जागरूकतेची चर्चा यानिमित्ताने यात्रेकरूंमध्ये सुरु होती.
राहुल गांधी काय बोलणार ?
कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. ६० दिवसांचा प्रवास करून या यात्रेने ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला. दोन दिवसांपासून ही यात्रा जिल्ह्यात आहे. देगलूर या तालुक्यातील वेन्नाळी, आटकळी, बिलोली तालुक्यांतील खतगाव फाटा, भोपाळामार्गे ही यात्रा ९ नोव्हेंबर रोजी नायगाव तालुक्यातील शंकरनगर येथे पोहोचली आहे. आज शंकरनगर, नायगाव आणि कृष्णूरपर्यंतचा प्रवास करून ही यात्रा दुपारी नांदेड शहरातील देगलूर नाका येथे पोहोचली. संध्याकाळी शहरातील नवा मोंढा येथे राहुल गांधी राज्यातील पहिल्या जाहीर सभेस संबोधित करणार आहेत.
राज्याच्या राजकारणावर काय बोलणार?
महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. शिवसेनेतील बंडाळीनंतर हे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे गट- भाजपचे सरकार स्थापन झाले. यावर राहुल गांधी काय बोलतात? देशातील महागाई, बेरोजगारी, शिक्षणाच्या प्रश्नावरही त्यांची भूमिका गुरुवारी जाहीर सभेतून पुढे येणार आहे. त्यामुळे या जाहीर सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.