नांदेड :
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात सोमवारी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आगमन होणार आहे. काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करेल. यावेळी पदयात्रेकरूंच्या हातात मशाली असतील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
यात्रेमध्ये थोडाफार बदल करण्यात आला असून, यात्रा उद्या, सोमवारी दुपारी चारऐवजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास देगलूर येथे पोहोचेल. येथून पुढे वन्नाळीकडे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास यात्रा मार्गक्रमण करेल, असे चव्हाण म्हणाले.
यात्रा नांदेडात चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिममधून मार्गक्रमण करेल. नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे राहील. मंगळवारचा मुक्काम शंकरनगर रामतीर्थ, बुधवारी-वझिरगाव फाटा, गुरुवार- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होईल.
पहिल्यांदाच मशाल यात्राभारत जाेडाे यात्रेत पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे. ८ नाेव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे रात्री बारा वाजता गुरुद्वारात जाऊन खासदार राहुल गांधी हे दर्शन घेणार आहेत.