२३ मार्चला भास्करराव खतगावकरांच्या मनगटी घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 19:27 IST2025-03-17T19:26:52+5:302025-03-17T19:27:23+5:30
काँग्रेसमध्येही मला खूप मानसन्मान मिळाला. परंतु राजकारण करताना परिस्थिती अशी होते की त्यावेळी पक्ष बदलावा लागतो.

२३ मार्चला भास्करराव खतगावकरांच्या मनगटी घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
नांदेड : माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्यासह मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून, येत्या २३ मार्चला नरसी येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही मंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी दिली.
चिखलीकर म्हणाले, खतगावकर यांनी अनेक वर्षे राज्यात, देशात नांदेडचे लोकप्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. २३ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, नवाब मलिक, बाबासाहेब पाटील या नेत्यांची नरसी येथील कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. महायुतीत आजपर्यंत फक्त भाजपने निलंबित केलेल्या मंडळींनाच राष्ट्रवादीत घेण्यात आले आहे. शिंदे गट किंवा भाजपच्या इतर मंडळींना पक्षात प्रवेश दिला नाही. महायुती भक्कम असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यपातळीवर नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहणार आहे. सत्ता केंद्र वसंतनगर राहणार की राजेंद्रनगर, हा मुद्दा नाही. खतगावकर हे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मी आता राष्ट्रवादीत थांबणार असून, ज्या-ज्या पक्षात आजपर्यंत गेलो, त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे आमची कुणाशीही स्पर्धा नाही, असेही चिखलीकरांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, बाळासाहेब रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार मोहन हंबर्डे, मीनल खतगावकर, रामदास पाटील, जीवन घोगरे यांची उपस्थिती होती.
शिंदेसेनेकडूनही होती ऑफर
गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात मला आजपर्यंत सर्व समाजाने मदत केली. काँग्रेसमध्येही मला खूप मानसन्मान मिळाला. परंतु राजकारण करताना परिस्थिती अशी होते की त्यावेळी पक्ष बदलावा लागतो. आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो, त्या भागातील लाेकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, हा मूळ उद्देश असतो. मला शिंदेसेनेकडूनही ऑफर होती. परंतु राष्ट्रवादी हा सेक्युलर पक्ष असल्यामुळे मी राष्ट्रवादीची निवड केली, अशी प्रतिक्रिया माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी दिली.