खतगावकरांची काँग्रेस ‘एंट्री’ कोणाच्या पथ्यावर? देगलूर पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 04:40 PM2021-11-01T16:40:10+5:302021-11-01T16:41:06+5:30
काँग्रेस नेते तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी सुरूवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात आली.
- श्रीनिवास भोसले
नांदेड : देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी केलेला काँग्रेस प्रवेश भाजपसह मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांनाही रूचला नाही. दादांच्या प्रवेशाने जितेशचा विजय निश्चित असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सभेत सांगितले. परिणामी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आपले अस्तित्व संपुष्टात येण्याची भीतीने त्यांनी प्रचारापासून एक पाऊल मागे राहणे पसंत केले. त्यामुळे दादांची काँग्रेस एंट्री कोणाच्या पथ्यावर पडेल, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.
कॉँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने पोटनिवडणूक झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने देगलूरची जागा काँग्रेसला राहिली. त्या ठिकाणी काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. तर, भाजपकडून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली. दरम्यान, देगलूरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात भाजप असेच चित्र निर्माण झाले.
काँग्रेस नेते तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी सुरूवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. देश, राज्य पातळीवर नेत्यांच्या प्रचारसभा आणि महाविकास आघाडी सरकार राज्यात असल्याने मतदार संघाचा होणारा विकास, अंतापूरकर कुटुंबीयांबद्दल असलेली सहानुभूती हे मुद्दे जितेश अंतापूरकरांचा विजयश्री खेचून आणतील, असा विश्वास काँग्रेस गोटातून व्यक्त होत आहे. तर शेवटच्या टप्प्यात भाजपने प्रचाराला गती देत खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला. आरएसएस, हिंदूत्ववादी संघटना, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही भाजपच्या उमेदवारासाठी ग्राऊंड लेव्हलवर मेहनत घेतली. त्यातच वंचित बहुजन आघाडीने प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही. त्यात ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारसभांना मिळालेल्या प्रतिसादाने वंचितच्या कार्यकर्त्यांना शेवटच्या टप्प्यात बळ मिळल्याने त्यांच्यात उत्साह संचारला होता. दरम्यान, आरपीआय खोब्रागडे गटाचे उमेदवार, जनता दल सेक्युलर आणि इतर अपक्ष उमेदवारांच्या मतविभाजनाचा फटका काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.
भाजप-काँग्रेसपेक्षाही दादांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या प्रवेशाने जितेश यांचा विजय निश्चित असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले. प्रचारादरम्यान निकालापूर्वी विजयाचे श्रेय दादांना दिल्याने स्थानिक काँग्रेस पदाधिकारी नाराज झाले. काँग्रेस विजयी झाली तर, दादांचीच ताकद वाढेल या भीतीने काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी प्रचारात शांत राहणे पसंत केले. तर, दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुद्द खतगावकर यांच्या सोडचिठ्ठीमुळे आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल, असे वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेससह भाजपच्या जय-पराजयाचे बोल दादांवरच येणार आहेत.
निसटत्या फरकाने जिंकेल ?
महाविकास आघाडी सरकारविषयी असलेली नाराजी, माजी खासदार खतगावकर यांच्या एंट्रीने नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपला छुप्या पद्धतीने दिलेली साथ, काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी कत्तलखान्याबद्दल केलेले भाष्य आणि सेक्युलर मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला होऊन सुभाष साबणे यांचा निसटत्या फरकाने विजय होईल, असे भाजप कार्यकर्ते बोलत आहेत.
१२ उमेदवारांनी लढवली निवडणूक
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे दिवंगत रावसाहेब अंतापूरकर हे २२ हजार ४३३ मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी अंतापूरकरांना ८९ हजार ४०७ मते मिळाली होती. तेव्हा शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांना ६६ हजार ९७४ मते मिळाली होती. ते दुसऱ्यास्थानी होते. याच निवडणुकीत तिसऱ्या स्थानी असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या रामचंद्र भरांडे यांना १२ हजार ५७ मते मिळाली होती. २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार असलेले बालाजी बांडे यांना ३ हजार ५२३ मते मिळाली होती. २०१९ पेक्षा नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीची परिस्थिती फार वेगळी आहे. यावेळी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह १२ जणांनी ही निवडणूक लढविली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसह इतर अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसेल, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.