भोकर (वार्ताहर) शहरात हातावर पोट घेवून जगण्याची शिकस्त करणाऱ्या मध्यप्रदेश, विदर्भासह विविध जिल्ह्यातील दिडशे पेक्षा अधिक फिरस्ती मजूर स्थानबद्ध झाले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न लॉकडाऊन मुळे निर्माण झाला आहे.
गावात रोजगार मिळत नसल्याने गावोगावी फिरुन उदरनिर्वाह करण्याची मानवी जीवाची धडपड कोरोना प्रादुर्भावाने थांबविल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरात देशातील विविध भागातून आलेले फिरस्ती मजूर कुटुंब समूह शहरातील बटाळा रस्त्याच्या मोकळ्या जागेत पाली टाकून गुजराण करीत आहे. यातील एका समूहात परभणी जिल्ह्यातील रेणकापूर आणि नांदेड जिल्ह्यातील माळेगाव (जत्रा), लोहा, अर्धापूर येथील ११ पुरुष १३ महिला व त्यांच्या सोबत १८ लहान बालके आहेत. सदरील मजूर गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून प्लेस्टिकचे टोपले, बकेट खरेदी करतात. त्या प्लेस्टिकच्या वस्तू शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात डोक्यावर, दुचाकी वरुन विक्री करतात. यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशाच प्रकारे अन्य समूहात विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, पांढरकवडा येथून आलेल्या ६८ जणांचे दोन समूह आहेत. या समूहातील पुरुष मंडळी दुचाकीवर फिरुन लोखंडी पलंग विक्री करतात. तसेच शहरातील उमरी रस्त्यावर कृष्ण मंदिराच्या समोर मध्यप्रदेशातील जबलपूर येथील २८ जणांचा समूह आहे. यातील पुरुष कारागीर असून हार्मोनियम (पेटी वाद्य) दुरुस्तीचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
वरील सर्व हातावर पोट असलेले मजूर मागील काही महिन्यांपूर्वी शहरात दाखल होवून फिरस्ती करुन जगत होती. दरम्यान अचानक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर लोकं घराबाहेर पडत नाहीत, वाहतूक व्यवस्था बंद झाली आहे. यामुळे हातावर पोट भरणाऱ्या अशा मजूरदारांचा रोजगार ठप्प पडल्यामुळे आतापर्यंत जवळच्या मेहनतीच्या पैशावर गुजरान झाली परंतू सततच्या बंद मुळे जवळचा पैसा अडका संपून धान्य सुध्दा संपले आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने धान्य पुरवावे अशी विनवणी संकटात सापडलेले कुटुंबिय करीत आहेत.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत तालुक्यात अडकून पडलेल्या पर राज्यातील व जिल्ह्यातील मजूरांचा त्यांच्या कुटुंबाचा सर्वे करण्यात येवून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शना प्रमाणे उपाययोजना करण्यात येईल. तसेच काही सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत त्यांचीही मदत घेण्यात येत आहे. - भरत सुर्यवंशी, तहसीलदार भोकर.