भोकर (नांदेड ) : येथील नगर परिषदेच्या अग्नीशमनदलात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीत गैरव्यवहार झाल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला. यात तत्कालीन दोन मुख्याधिकारी, तत्कालीन नगराध्यक्ष यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे.
येथील पालिकेतील तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला असून एका सत्ताधारी नगरसेवकाच्या आक्षेपानंतर न्यायालयाच्या आदेशाने १४ जून रोजी घनकचरा व्यवस्थापनात साडे दहा लक्ष रूपयाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ताजे असतांनाच राष्ट्रवादी पक्षाच्या प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका अरूणा विनायकराव देशमुख यांनी नगर परिषदेत सन २०१५ मध्ये झालेल्या अग्निशमनदलातील नौकर भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करून भोकर न्यायालयात दाद मागीतली होती.
यावरून न्यायालयाने संगनमत करून पूर्व नियोजित कट रचणे, पदाचा दुरूपयोग करत बनावट दस्तावेज तयार करून जनतेची व शासनाची फसवणूक केल्याबाबत विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिले. यावरून तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, तत्कालीन नगर अभियंता (विद्यूत) गजानन सावरगाकर, तत्कालीन पाणी पुरवठा अभियंता श्रीहरी चोंडेकर, तत्कालीन लेखापाल रामसिंग लोध, शारिरीक शिक्षक (नाव नाही), फायरमन त्रिरत्न सुरेश कावळे, रमाकांत पंढरीनाथ मरकंठे, संदिप मारोतीराव श्रीरामवार, नागेश व्यंकटराव चाटलावार, शिपाई दिलीप नारायण देवतळे, संजय बंन्सी पवार, महेश सुरेशराव दरबस्तवार, नारायण रामा आदेवाड आदी १५ जणांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.उप निरिक्षक पूनम सूर्यवंशी करत आहेत.