समर्पण अभियान
किनवट - अयोद्धेत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान किनवट तालुक्यात घेण्यात येत आहे. पूर्वतयारीसाठी साई मंदिरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने २० रोजी बैठक घेण्यात आली. निधी संकलनासाठी १० रुपये, १०० रुपये आणि १ हजार रुपये याप्रमाणे कूपन छापण्यात आले. रामभक्तांकडून स्वेच्छेने हा निधी घेतला जाणार आहे.
गाडगे महाराजांना अभिवादन
कुंटूर - येथील एकता महिला ग्रामसंघाच्या कार्यालयात संत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रमाबाई आंबेडकर स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेखा कांबळे, एकताच्या ज्योती गाडगे, लताबाई कुंटूरकर, रुक्मिणबाई भोजराज, सुनीता नाईकवाडे, रंजना नाईकवाडे, विमल महाजन, ललिता बालाजी आदींची उपस्थिती होती.
कामांचे फलक गायब
किनवट - तालुक्यातील पळशी, कनकी, पिंपळगाव फाटा भागातील विकासकामांचे फलक गायब झाले आहेत. त्यामुळे कोणत्या योजनेतून किती कामे झाली, कोणती कामे सुरू आहेत, कामाचे स्वरूप काय, याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
वन्यप्राण्यांकडून नासाडी
बोधडी - किनवट तालुक्यातील बोधडी परिसरात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वीच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा गेला. सर्व दारोमदार रबीवर असताना वन्यप्राण्यांकडून नासाडी होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
अखंड हरिनाम सप्ताह
नांदेड - सिबदरा ग्रामस्थांनी दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहाची सुरुवात २२ रोजी झाली. २९ रोजी सांगता होणार आहे. यानिमित्त दररोज सकाळी काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन होणार आहे. यात नामवंत मार्गदर्शन करणार आहेत.
कापसाचा ट्रक उलटला
उमरी - उमरीहून धर्माबादकडे जाणारा ट्रक उलटून ३५ क्विंटल कापसाचे नुकसान झाले. त्यामुळे वाहतूक विस्कळीतही झाली. ही घटना २२ डिसेंबर रोजी धर्माबादजवळ घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करून रुंदीकरण करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख साहेबराव शिंदे यांनी केली आहे.
मीना यांना पदोन्नती
उमरी - येथील रेल्वेस्थानकात तिकीट बुकिंग लिपिक रामधन मीना यांना गुडस् गार्डपदी पदोन्नती मिळाली. डीआरयूसीसी मेंबर पारसमल दर्डा यांनी मीना यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक गजानन श्रीरामवार, डॉ. अशोक मामिडवार, भरतलाल मीना, स्टेशन मास्तर कमलेश कुमार, विजय चव्हाण, नरेंद्र दर्डा, सिंधू दर्डा, गजानन आलसेटवार आदी उपस्थित होते.