बिलोली (नांदेड ) : तालुक्यातील कोळगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज लिलाव झाला. दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू असलेल्या या साठ्यास दीड कोटीची बोली लागली आहे.
आठवडाभरापूर्वी कोळगाव, तोरणा, कुंभारगाव येथील शेतशिवारात अवैध वाळू साठ्यावर बिलोली महसूल प्रशासनाने धाड टाकली़ सदरील पकडलेली वाळू नेमक्या कोणत्या घाटाची आहे हे अद्याप कळायला मार्ग नाही़ दोन तालुक्यांची सीमा असल्याने हा वाळू साठ्याचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजमापनुसार १७ ठिकाणच्या अवैध साठा दहा हजार ब्रासपेक्षा जास्त आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये आज या वाळूसाठ्याचा लिलाव झाला. यावेळी शासनाने साठ्याची किंमत १ कोटी ३५ लाख रुपये निश्चित केली होती. मात्र, लिलावात यासाठी १ कोटी ५० लाखाची बोली लागली.
संपूर्ण मराठवाड्यात सर्वाधिक गौण खनिज महसूल मिळतो, अशी बिलोलीची ओळख आहे़ गोदावरी व मांजरा या दोन नद्यांचे वरदान बिलोली तालुक्याला आहे़ आता मार्च एण्डसाठी महसूल उद्दिष्ट ठरविण्यात आले़ महसूल जमीन अकृषिकचे दहा लाख टार्गेट आहे; पण गौण खनिज अंतर्गत तब्बल २२ कोटींचे टार्गेट देण्यात आले़ त्यानुसार आतापर्यंत बिलोली तहसीलचा आकडा सात कोटीपर्यंत गेलेला आहे़