नांदेड : शहरातील गुुरुद्वारा भागात झालेल्या गोळीबार प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाकडून आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. गुन्ह्यातील पाच आरोपींची यापूर्वीच तुरुंगात रवानगी करण्यात आली असून, पंजाब येथून आणलेल्या शार्प शूटरसह अन्य दोघांना १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी शहरातील गुरुद्वारा भागात दुचाकीवरून आलेल्या एकाने दोघांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात रवींद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाला होता, तर गुरमितसिंघ सेवादार हा गंभीर जखमी झाला होता.
हे प्रकरण दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याच्याशी संबंधित असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता. गोळीबार प्रकरणात सुरुवातीला नांदेडातील पाच जणांना पकडण्यात आले होते. या पाच जणांनी शूटरला मदत केली होती. त्यानंतर, पंजाब येथून जगदीपसिंघ उर्फ जग्गा आणि शुभदीपसिंघ या दोघांना आणण्यात आले होते, तर नांदेडातील पलविंदरसिंघ बाजवा याच्याही मुसक्या आवळल्या होत्या. या तिघांना विशेष मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिघांची १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.