नांदेड : शहरातील कैलास बिगानिया आणि विक्की चव्हाण टोळीचे साम्राज्य खालसा झाल्यानंतर काही भूरटे त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाचप्रकारे 'बिगानिया, चव्हाण गया अब मै डॉन', असे म्हणून दहा हजार रुपयांचा हप्ता मागत असलेल्या आरोपीला नांदेड ग्रामीण पाेलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीला न्यायालयाने १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कौठा भागातील बिगानिया आणि चव्हाण टोळीने शहरात हैदोस घातला आहे. टोळीयुद्धातून त्यांच्या टोळीतील अनेकांचे जीव गेले. पोलिसांनी मात्र आता या दोन्ही टोळ्यांचा सफाया केला आहे. दोन्ही टोळीतील आरोपींच्या विराेधात मोक्काची कारवाईही करण्यात येत आहे. त्यामुळे नांदेडकरांनी सुटकेचा श्वास सोडला होता. परंतु आता काही भूरटे त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कौठा भागातील अनिल श्रावण सोळंके हाही त्यातीलच एक. एका बोअरवेल चालकाला त्याने यापुढे दर महिन्याला दहा हजार रुपयांचा हप्ता दे, नाहीतर खून करतो अशी धमकी दिली. गेल्या काही दिवसांपासून तो अशाचप्रकारे खंजर घेवून लोकांना धमकावित होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोउपनि आनंद बिचेवार यांनी डिबी पथकाच्या मदतीने अनिलच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली. आरोपीला न्यायालयाने १५ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भूरट्या गुन्हेगारांवर वॉचकौठा भागात अशाप्रकारे भूरटेगिरी करीत असलेल्या गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात येत आहे. सोळंके याच्यासोबत अन्य कुणी होते का? याचाही तपास सुरु आहे. आरोपीकडून खंजर जप्त करावयाचे आहे. अशी माहिती पोउपनि आनंद बिचेवार यांनी दिली.