शहरातील बसवेश्वर नगर येथील एका घरातून चोरट्याने दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. ही घटना २१ मे रोजी घडली. सुनिल सुभाष जाधव हा तरुण घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपला होता. पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्याने घरात प्रवेश केला. जाधव यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविला. याप्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नळाच्या पाण्यावरुन शेजार्यांमध्ये वाद
कंधार तालुक्यातील मौजे फुलवळ येथे नळाच्या पाण्यावरुन दोन शेजार्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर एकाला लाकडाने मारहाण करण्यात आली. ही घटना २० मे रोजी घडली. सुर्यकांत भिमराव स्वामी याने शेजार्याच्या पत्नीस नळामध्ये कॅरीबॅग कोणी टाकली म्हणून विचारत होते. त्याचवेळी महिलेच्या पतीने स्वामी यांना शिवीगाळ करीत लाकडाने मारहाण केली. या प्रकरणात कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रस्ता ओलांडणार्या तरुणाला उडविले
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा जवळील पेट्रोल पंप रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील छोटा हत्ती या वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २० मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली.
तुळशीराम मारोती सोनटक्के रा.जुना कौठा हा तरुण शेताकडून घराकडे परत येत होता. विद्यापीठाच्या जवळील पेट्रोल पंप रस्त्यावर लघूशंका करुन तो रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील एम.एच.०४, एचडी ६२४५ या क्रमांकाच्या छोटा हत्ती या वाहनाने सोनटक्के यांना धडक दिली. गंभीर जखमी असलेल्या सोनटक्के यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणात जळबाजी सोनटक्के यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हातभट्टीचे रसायन केले जप्त
माहूर तालुक्यातील मौजे इवळेश्वर गावाजवळील नाल्यात हातभट्टीची दारु काढण्यात येत होती. पोलिसांनी या ठिकाणी धाड मारुन साडे पाच हजार रुपयांचे रसायन जप्त केले. या प्रकरणात पोकॉ.प्रकाश देशमुख यांच्या तक्रारीवरुन माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.