सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नांदेड- चार मुली झाल्याने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून माहूर तालुक्यातील मौजे पानोळा तांडा येथे महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २० एप्रिल रोजी घडली. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अरुणा अशोक राजूरकर असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेला चार मुली आहेत. परंतु मुलीच होत असल्याने सासरच्या मंडळींकडून त्यांना त्रास देण्यात येत हाेता. तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु माहेरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अरुणा या पैसे आणण्यास असमर्थ ठरल्या. परंतु त्रास वाढतच गेल्याने त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आशिष चुळबुळकर यांच्या तक्रारीवरून अशाेक दत्तात्रय राजूरकर, जिजाबाई राजूरकर, शांताबाई गोत्रमपल्ले, सिंधूबाई हिवाळे आणि कांताबाई गुडापे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि व्ही. एल. जाधव करीत आहेत.
उधारी परत मागितल्याने मारहाण
नांदेड- उधारीने हळदीचे बेणे दिल्यानंतर त्याचे पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना लोहा तालुक्यातील मौजे येली शिवारात घडली.
मारोती जगदेवराव कदम यांनी व्यंकटी शंकर सोमवारे याला हळदीचे बेणे उधारीवर दिले होते. २१ एप्रिल रोजी कदम हे सोमवारे याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले. यावेळी सोमवारे याने कदम यांना खाली पाडून बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
स्विफ्ट कारची परस्पर विक्री
मुलाबाळांना सोडण्यासाठी मित्राची कार घेऊन गेलेल्या एकाने त्या कारची परस्पर विक्री केली. ही घटना लोहा तालुक्यात घडली. या प्रकरणात लोहा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
नमाकांत हनमंत नलबले यांचा मित्र प्रदीप चक्रनारायण व सोहेनशहा हारुणशहा हे दोघेजण त्यांच्याजवळ आले होते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कामधंदा नाही. त्यामुळे मुलाबाळांना गावाकडे सोडतो म्हणून त्यांनी नलबले यांची (एमएच-१४, जीडी ४५६९ या क्रमांकाची गाडी घेतली. त्यानंतर नलबले यांची संमती न घेताच त्या कारची परस्पर विक्री करण्यात आली.