किरकोळ कारणावरून शेतकऱ्याला मारहाण
नांदेड : हदगाव तालुक्यातील वायफना येथे किरकोळ कारणावरून एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. किरण गोविंदराव शिंदे हे शेतात असताना आरोपी त्या ठिकाणी आला. तुझ्यामुळे माझ्या घरात भांडण लागले आहे, असे म्हणून त्याने शिंदे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना २ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणात तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोउपनि डुडुळे हे करीत आहेत.
मुली झाल्या म्हणून विवाहितेचा छळ
नांदेड : मुलगा न होता चार मुलीच झाल्या म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना औंढा नागनाथ येथे घडली. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दिली.
पीडितेस दुचाकी घेण्यासाठी माहेराहून १ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली होती. मागणी पूर्ण होत नसल्याने आरोपीने चार मुलीच झाल्या, मुलगा का होत नाही म्हणून पीडितेला मारहाण करून घराबाहेर हाकलले. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास पोउपनि मांगूळकर हे करीत आहेत.
शहरात मटका अड्ड्यावर धाड
नांदेड : शहरातील नमस्कार चौक भागात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. २ जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली. या ठिकाणी कल्याण नावाचा मटका सुरू होता. आरोपीकडून ३ हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.