लिंबगाव शिवारात मोटार लंपास
लिंबगाव शिवारात कवठेकर यांच्या शेताजवळून चोरट्याने २० हजार रुपयाची विद्युत मोटार लंपास केली. ही घटना १६ मे रोजी घडली. संतोष धनसिंग कदम यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. एशियन कंपनीची ही मोटार होती. या प्रकरणात लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दानपेटी फोडताना चोरट्याला पकडले
मुखेड तालुक्यातील सुगाव कॅम्प येथे मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला नागरिकांनी पकडले. ही घटना १८ मे रोजी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुगाव कॅम्प येथील मारोती मंदिराच्या बाजूला आरोपीने आपली दुचाकी लावली होती. त्यानंतर दानपेटीचा कडीकोंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडले. या प्रकरणात तुळशीराम शेषराव लवटे यांच्या तक्रारीवरून मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
५० हजारासाठी पत्नीला दिला तलाक
मुखेड शहरातील बालाजी गल्ली येथे पीडितेने माहेराहून ५० हजार रुपये न आणल्याच्या रागातून पतीने तीन वेळेस तलाक असा शब्द उच्चारला. ही घटना १६ मे रोजी घडली. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
पीडित विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन येण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी पीडितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे विवाहिता माहेरी नांदेड शहरात आली होती. यावेळी चिडलेल्या पतीने फोनवरून त्यांना तलाक दिला. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून पती सय्यद चाँद, सासू कुबरा बी, सय्यद, सय्यद सदाम यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सहा जणांनी केली शेतकऱ्याला मारहाण
धर्माबाद तालुक्यातील हारेगाव शिवारात शेतीच्या वादातून सहा जणांनी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना १६ मे रोजी घडली. नागोराव लक्ष्मण शिंदे हे शेतकरी शेतात काम करीत असताना त्या ठिकाणी आरोपी आले. हे आमचे शेत असून तू कसा काम करतोस म्हणून वाद घालत मारहाण केली. या प्रकरणात धर्माबाद पोलीस ठाण्यात देवीदास रामचंद्र शिंदे, तानाजी रामचंद्र शिंदे, बालाजी रामचंद्र शिंदे, लक्ष्मण तुळशीराम शिंदे, आकाश तानाजी शिंदे आणि हणमंत देवीदास शिंदे यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.