मुजामपेठ येथील अंकलेश पवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची पत्नी शुभांगी पवार यांनी त्यांना शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये १६ एप्रिल २०२१ रोजी दाखल केले होते. या ठिकाणी दाखल करताना त्यांच्याकडून अनामत म्हणून ५० हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. त्यातच २० एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलविल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच दिवशी ३५ हजार रुपयांचे इंजेक्शन द्यावे लागणार असून पैसे जमा करण्यास सांगितले होते. शुभांगी यांनी पैसे भरण्यासाठी मुदत मागितली होती, रुग्णालयाने त्यांना दोन दिवसांची मुदत दिली. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शुभांगी यांनी रुग्णालयात ९० हजार रुपये जमा केले. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांना अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शुभांगी यांनी मृतदेह आणि उपचाराची कागदपत्रे मागितली; परंतु रुग्णालयाने ती देण्यास नकार दिला होता. अखेर रुग्णालयाने त्यांच्या पतीचा मृतदेह ताब्यात दिला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर २६ एप्रिल रोजी त्यांना उपचाराची कागदपत्रे देण्यात आली. त्यात अंकलेश पवार यांचा २१ एप्रिल रोजी १२ वाजता निधन झाल्याची नोंद असल्याचे धक्कादायक पुढे आले. विशेष म्हणजे या तिन्ही दिवसांची बिले लावण्यात आली होती. अशा प्रकारे जादा बिल आकारून प्रेताची विटंबना केल्याने शुभांगी यांनाही धक्का बसला होता. त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता आणखी ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात शुभांगी यांनी ॲड. शिवराज पाटील लोहगावकर यांच्या मदतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अतिरिक्त बिलाची केली वसुली
गोदावरी रुग्णालयात अंकिलेश पवार यांचा २१ एप्रिल रोजी मृत्यू झालेला असताना फक्त बिलाचे पैसे येण्याचे असल्यामुळे २४ तारखेपर्यंत त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाकडून कळविण्यात आले होते. सदरील रुग्णाच्या तपासणीचे कागदपत्रे गोदावरी रुग्णालयानेच आम्हाला दिली आहेत. त्यामध्ये स्पष्टपणे पवार यांचा मृत्यू २१ एप्रिल रोजी झाल्याचे नमूद आहे. अशा प्रकारे रुग्णालयाने फसवणूक केली आहे. त्याचबरोबर शासकीय दरापेक्षा अधिकचे दर रुग्णाच्या नातेवाइकाकडून वसूल केले आहेत, अशी प्रतिक्रिया शुभांगी पवार यांचे वकील ॲड. शिवराज पाटील लोहगावकर यांनी दिली.