बिलोली (जि़ नांदेड) : तालुक्यातील शंकरनगर येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसूल याला जिल्हा सत्र न्यायालयाने २३ जानेवारी रोजी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात हजारोंची गर्दी जमली होती़
शंकरनगर येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील आरोपी शिक्षक सय्यद रसूल व दयानंद राजूळे यांनी अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार केल्याची घटना १७ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. सदरची घटना दडपण्याच्या हेतूने मदत करणाऱ्या प्राचार्य धनंजय शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांच्या विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यामध्ये पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन १८ जानेवारी रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती. २२ जानेवारी रोजी मुख्य आरोपी सय्यद रसूल याला स्थानिक गुन्हे शाखेने लातूर जिल्ह्यातून अटक केली होती. त्याला गुरुवारी बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. मांडे यांच्यासमोर हजर केले. पोलिसांच्या वतीने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. संदीप कुंडलवाडीकर बाजू मांडली. आरोपीच्या वतीने अॅड. मनोज आरळीकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या. विक्रमादित्य मांडे यांनी ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयाबाहेर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
पोलीस अधीक्षकांनी घेतली झाडाझडतीया प्रकरणामध्ये संशयास्पद भूमिका असणाऱ्या सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांना निलंबित करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात झाडाझडती घेतली़