नांदेड : जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी स्वत: बायोडिझेलचा बनावट पेट्रोलपंप आज सकाळी पकडला आहे. या ठिकाणी 17 हजार लिटर बायोडिझेल सापडले आहे. हा पेट्रोलपंप नांदेड ग्रामीण पोलीसांच्या वाजेगाव चौकीच्या पाठीमागेच असल्याचे सांगण्यात आले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची चलती आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजेगाव पोलीस चौकीच्या मागे असलेल्या आळणी बुवा मठाजवळ एका शटरमध्ये धाड टाकली. लगेच त्यांनी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना बोलावले. त्याशटरमध्ये तीन मोठ-मोठ्या प्लॅस्टीक टाक्या आणि एक निळ्या रंगाची त्यापेक्षा लहान प्लॉस्टीक टॉकी सापडली. या टाक्यांना जोडून पेट्रोलपंपमध्ये असतात तसे पाईप जोडलेले होते. या पाईपांना वापरण्यासाठी दोन अश्वशक्तीची मोटार जोडलेली होती. सोबतच त्या ठिकाणी रिकामा झालेला एक बायोडिझेल टॅंकर सुध्दा होता.
विशेष म्हणजे हे ठिकाण नांदेड ग्रामीण पोलिसांच्या वाजेगाव चौकीच्या मागे आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक आल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना देखील बोलाविण्यात आले. त्यानंतर 17 हजार लिटर बायोडिझेल, शटरमधील सर्व साहित्य आणि रिकामा झालेला एक टॅंकर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे. बायोडिझेल पकडले त्याठिकाणाहून तीन व्यक्ती पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.