नांदेड : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता खाजगी कोचिंग क्लासेसला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने राज्यातील पाच विभागांत बायोमेट्रीक पद्धत लागू करण्याचे जाहीर केले होते. आता नांदेडसह लातूरमध्येही ही पद्धत बंधनकारक करण्यात आली असून याची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित उपस्थित राहत नसल्याने बायोमेट्रीक पद्धत लागू केली. चालू शैक्षणिक वर्षापासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या पाच विभागांतील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पद्धतीने घेण्याचे जाहीर केले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर विभागाचा समावेश नव्हता. मात्र लातूर येथील क्लासेस चालकाच्या हत्येनंतर शिक्षण विभागाने लातूरसह नांदेडमध्येही ही पद्धत यंदापासूनच सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये खाजगी अनुदानीत, विना अनुदानीत, अंशत: अनुदानीत, स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांचा (विज्ञान शाखा) समावेश असणार आहे. बायोमेट्रीक उपस्थिती सुरु करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी एक महिन्याच्या आत स्वत: उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक पद्धत सुरु करण्यात आली आहे की नाही, याबाबतची तपासणी शिक्षण उपसंचालक यांच्यासह शिक्षण उपनिरीक्षक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तपासणी करण्यात येईल लातूर विभागातही कनिष्ठ महाविद्यालयातील (विज्ञान शाखा) विद्यार्थ्यांची उपस्थिती यंदापासूनच बायोमेट्रीक पद्धतीने घेण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयांनी याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अंमलबजावणी झाली की नाही, याचीही तपासणी शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे. - अशोक देवकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), नांदेड