शिवराज बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गेन बिटकॉईनने शेकडो नांदेडकरांना गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ या प्रकरणात आतापर्यंत १७० बिटकॉईनचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून आणखी काही तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून आपले गा-हाणे मांडले़ त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे़व्हर्च्युअल करन्सी, क्रिप्टोकरन्सी म्हणजेच अदृश्य चलनाच्या मायाजालात ओढत गेट बिटकॉईनच्या माध्यमातून त्याने नांदेडकरांना गंडविले होते. नांदेडातील फसवणुकीचा हा आकडा तब्बल शंभर कोटीपर्यंत गेला आहे़ यामध्ये अनेक प्रतिष्ठित मंडळींचा समावेश आहे़ अमित भारद्वाज याने ओळखीचा फायदा घेत नांदेडात अनेकांशी संपर्क साधून त्यांच्याकडील बिटकॉईन घेतले होते़ त्यावेळी या अदृश्य चलनाच्या बाजारात एका बिटकॉईनची किमंत ही ७३ हजार रुपये एवढी होती़ या बिटकॉईनच्या बदल्यात अमित भारद्वाज याने १८ महिन्यांत ८० टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते़ सुरुवातीला काही जणांना ही रक्कमही देण्यात आली़ त्यानंतर मात्र भारद्वाज याने गुंतवणूकदारांना बिटकॉईन देण्यास नकार दिला़ त्या बदल्यात त्याने स्वत: तयार केलेले एम कॅप हे चलन गुंतवणूकदारांच्या माथी मारले़त्यावेळी एम कॅपची बाजारात किंमत केवळ १४ हजार रुपये होती़ परंतु हे एम कॅप जर खरेदीदाराने भारद्वाजला विक्री केल्यास तो त्याची किंमत अर्ध्याहून कमी देत होता़ अशाप्रकारे भारद्वाज बिटकॉईन ग्रोथ फ्रंट या कंपनीच्या माध्यमातून बिटकॉईन आणि एम कॅप या दोन्ही आभासी चलनाद्वारे गुंतवणूकदारांना गंडविले़आता भारद्वाजच्या अटकेमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे़ तर दुसरीकडे त्याने तयार केलेल्या एम कॅपचे बाजारात मूल्य काही चिल्लर पैशावर येवून पोहोचले आहे़दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून नांदेडातील आणखी काही गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांची भेट घेतली आहे़ या प्रकरणात तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे़असा खरेदी केला जातो बिटकॉईन...बिटकॉईन खरेदीसाठी नांदेडातील अनेकांनी ‘झेब पे’या ट्रेड कंपनीचा वापर केला़ मोबाईलवरुन तो डाऊनलोड करुन त्यामध्ये खाते उघडले जाते़ तत्पूर्वी आरटीजीएसद्वारे आपल्याला शक्य तेवढी रक्कम झेब पे च्या खात्यात पाठविली जाते़ त्यानंतर झेब पे च्या आपल्या खात्यावर ती रक्कम दिसण्यासाठी आरटीजीएस केलेल्या पावतीचा क्रमांक नमूद करावा लागतो़ एवढी सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटांत बिटकॉईन खरेदी करता येतो़डिसेंबर महिन्यात बिटकॉईनचे दर तब्बल १५ लाख रुपयापर्यंत गेले होते़ विशेष म्हणजे, दहा हजार रुपयांपासून बिटकॉईनचे भाग खरेदी करता येतात़ त्यामध्ये कमीत कमी एका बिटकॉईनचा दहावा भाग खरेदी करावा लागतो़ जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत बिटकॉईनचे दर कमी राहत असून एप्रिलमध्ये या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविली़साडेतीन लाख रुपये दरआंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीवर बिटकॉईनचे दर अवलंबून असतात़ नांदेडात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी त्यावेळी हा बिटकॉईन ७३ हजार रुपयांना खरेदी केला होता़ त्यानंतर सातत्याने बिटकॉईनचे दर वाढतच गेले़काय आहे बिटकॉईन ?झेब पे वरुन खरेदी करण्यात आलेल्या बिटकॉईनला सॉफ्टवेअर असे गोंडस नाव देण्यात आले आहे़ या सॉफ्टवेअरसाठीचा ३२ अंकी कोड असतो़ त्यामध्ये संख्या, वेगवेगळे इंग्रजी शब्द यांचा समावेश असतो़ बिटकॉईन खरेदी किंवा विक्री करणे म्हणजे केवळ या ३२ अंकी कोडची देवाणघेवाण असते़ विशेष म्हणजे, या अदृश्य चलनाच्या बाजाराला आळा घालणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे़
नांदेडमध्ये बिटकॉईनचे १७० व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:46 AM
गेन बिटकॉईनने शेकडो नांदेडकरांना गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ या प्रकरणात आतापर्यंत १७० बिटकॉईनचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून आणखी काही तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून आपले गा-हाणे मांडले़ त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे़
ठळक मुद्देव्याप्ती वाढली : गुंतवणूकदार पोलीस अधीक्षकांच्या भेटीला