मुखेड (नांदेड ) : मुखेड शहरालगत दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या ट्रक खाली आल्यामुळे जागीच ठार झाला. तर इतर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी २:३० वाजता लातुर राज्यमार्गावर झाला.
बापूराव माणिकराव टाळीकोटे ( ४२ , रा.कोडग्याळ) व त्याचा मेव्हणा सर्जेराव निवृत्ती देवकते ( २५, रा. हुलगंडवाडी) हे दोघे मुखेड येथील बाजारात खरेदीसाठी आले होते. खरेदीनंतर दोघेही मुखेडहून कोडग्याळकडे दुचाकीवरुन ( एम.एच. ४२ डब्ल्यू ३८०१ ) निघाले. याचवेळी समोरून नव्या दुचाकीवर विठ्ठल राठोड ( रा. निजामबाद) हा कमळेवाडी येथील नातेवाईकांना भेटून मुखेडकडे परतत होता. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.
जोरदार धडकेने बापूराव टाळीकोट हे वाहनावरून रस्त्यावर पडले. याच वेळी मुखेडच्या दिशेने एक मालवाहू ट्रक येत जात होती. रस्त्यावर पडलेले बापूराव या ट्रकच्या मागच्या टायरखाली आले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोलिस उपनिरिक्षक जि.डी.चित्ते, पोलिस जमादार धोंडिबा चोपवाड, किरण वाघमारे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.
गंभीर जखमी सर्जेराव देवकते व विठ्ठल राठोड यांच्यावर मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बापूराव टाळीकोट यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. टाळीकोट परिवारातील कर्ता पुरूष गेल्यामुळे सर्वञ हळहळ व्यक्त आहे.