अर्धापूर/मुदखेड/भोकर (नांदेड) : महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारा आणि चव्हाण कुटुबियांचा बालेकिल्ला म्हणून भोकर मतदारसंघाची ओळख आहे. येथे शंकरराव चव्हाण यांनी विजय मिळवित सतत २० वर्षे नेतृत्व केले होते. त्यानंतर सातत्याने हा मतदार संघ चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी राहिला आहे़. २०१४ अमिताताई चव्हाण, २०१९ मध्ये अशोकराव चव्हाण यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते़. त्यानंतर यावेळी खुद्द अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ त्यांच्या विरोधात काँग्रेसचे तिरुपती कदमसह २४ उमेदवार असुन चव्हाण कुटुंबीयांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने राज्यासह देशभरातील नेत्यांचे या जागेकडे लक्ष लागले होते. या ठिकाणी श्रीजया चव्हाण यांचा दणदणीत विजय झाला आहे.
भोकर मतदार संघावर आतापर्यंत चव्हाण कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले असून चव्हाण कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ, गड म्हणूनही भोकरची ओळख आहे़. काँग्रेसने तिरुपती कदम, वंचित बहुजन आघाडीने सुरेश राठोड तर बसपाने कमलेश चौदंते यांना उमेदवारी दिली आहे़. अपक्ष उमेदवारांसह एकूण २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. श्रीजया अशोकराव चव्हाण ( विजयी) झाले तर तिरुपती उर्फ पप्पू कदम हे (पराभूत) झाले आहेत. तर प्रचारादरम्यान दंड थोपटणे, ९६ कुळी वक्तव्य व शेवटच्या दोन दिवसात बदलले चित्र याचा फटका काँग्रेसला बसला.