उर्ध्व पैनगंगेचे पाणी पळविण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:21 AM2019-04-03T00:21:39+5:302019-04-03T00:24:55+5:30
डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी यावे यासाठी अथक प्रयत्नांतून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी नांदेड जिल्ह्याकडे वळविले़ परंतु, सध्याच्या भाजप सरकारची या पाण्यावर वक्रदृष्टी पडली आहे़ हे पाणी अन्यत्र वळविण्याचा घाट घातला जात आहे़
नांदेड : डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी यावे यासाठी अथक प्रयत्नांतून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी नांदेड जिल्ह्याकडे वळविले़ परंतु, सध्याच्या भाजप सरकारची या पाण्यावर वक्रदृष्टी पडली आहे़ हे पाणी अन्यत्र वळविण्याचा घाट घातला जात आहे़ एवढेच नव्हे, तर ते शेतीसाठी न वापरता नांदेड शहरासाठी वापरावे असाही दलबदलूंकडून प्रयत्न केला जात आहे़ हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येत्या १८ तारखेला मतदानाच्या माध्यमातून भाजपासह विरोधकांना धडा शिकवा असे आवाहन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़
मालेगाव येथे मंगळवारी चव्हाण यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला़ यावेळी मंचावर माणिकराव पाटील इंगोले, भाऊराव चव्हाण कारखान्याचे गणपतराव तिडके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रंगराव पाटील, शेतकरी संघटनेचे नेते माणिकराव राजेगोरे, पप्पू पाटील कोंडेकर, सुनील अटकोरे, सरपंच उज्ज्वला इंगोले, शेकापचे सरचिटणीस सुभाशिष कामेवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकनाथ पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, जि़प़सदस्या संगीता अटकोरे, सभापती मंगला स्वामी, लालजी कदम, बळवंत इंगोले यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़ दाभडी नाल्याचे पाणी सोडण्यासाठी सरकारपर्यंत जावे लागू नये, यासाठी आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला़ शासनाने यापूर्वी पाणी वाटपाचे धोरण ठरविले आहे़ त्यात बदल करु नये़ महत्त्वाचे म्हणजे पाण्याच्या प्रश्नात राजकारण व्हायला नको मात्र भाजपाकडून अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण खेळले जात आहे़ आणि त्याला आपल्याच जिल्ह्यातील काही दलबदलूंची साथ मिळत असल्याचा घणाघात करीत नेतृत्वाकडे विकासाची दृष्टी असावी लागते़ मागील पाच वर्षांत मी सत्तेत नव्हतो़ मात्र त्यानंतरही नांदेडच्या प्रश्नाबाबत जागरुकपणे लढा देत होतो़ तुम्ही सत्तेत होतात तुम्ही नांदेडसाठी काय दिलेत याचे उत्तर द्या असा खडा सवालही चव्हाण यांनी यावेळी केला़ काही जणांची सत्तेबरोबर निष्ठा बदलते़ माझ्या विरोधी उमेदवाराचा आता निवडणूक लढवित असलेला सहावा पक्ष आहे़ मुख्यमंत्री बदलला की त्याच्याबरोबर या उमेदवाराचाही पक्ष बदलतो़ बरे हे पक्षांतरही कुठल्या मुद्यासाठी नसते, तर मेहुण्याच्या सल्ल्यावरुन स्वत:च्या तुमड्या भरण्यासाठी असते़ आता नांदेडकरांनीही हे चांगले ओळखले आहे़ काँग्रेसकडेच विकासाची दृष्टी आहे़ त्यामुळे आम्ही बंद पडलेले कारखाने सुरु करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला़ या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या़ दुसरीकडे विरोधक दारुची दुकाने सुरु करण्यात मग्न आहेत़ अशा स्थितीत कोणाच्या पाठीशी उभे राहायचे याचा निर्णय नांदेडकरांना या निवडणुकीत घ्यावयाचा असल्याचे सांगत नांदेडकर काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील, असा ठाम विश्वास असल्याचेही खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले़
मतविभाजन होणार नाही
आम्ही विचाराने बांधलेली माणसे आहोत़ त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आग्रही असणा-या राजू शेट्टींना दोन महत्त्वाच्या जागा सोडल्या़ काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत या निवडणुकीत शेकाप, जनता दल, रिपाइं (कवाडे) आदी ५६ पक्ष संघटना एकत्रित आलो आहोत़ मागील वेळी ७० टक्के मतदान विरोधात असतानाही केवळ मतविभाजनामुळे भाजपाला सत्ता मिळाली होती़ यावेळी तसे होणार नाही़ याची दक्षता आम्ही घेतली आहे़ आता मतदारांनींही समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी असे आवाहन चव्हाण यांनी केले.